हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

राज्यसरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही यासंदर्भातील निर्णय दिला आहे, मात्र ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारे जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. पवार यांच्या घरावरील हल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी पवार यांना दूरध्वनी करून विचारपूस केली. त्यानंतर राज्यात नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असे सांगत ठाकरे यांनी या हल्यांची निंदा केली आहे.

एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी सरकारने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहचत असतानाच अचानक दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहचून त्याने घोषणाबाजी करतो व दगडफेक, चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना गृहमंत्र्यांना दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

या निंदनीय घटनेला प्रत्युत्तर म्हणून कुणीही कायदा व सुव्यवस्थेला धोका पोचेल, असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील. मात्र या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळय़ा भाजू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.