हाफिज सईदला ३२ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

मुंबईवरील दहशतवादी (२६-११) हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या हाफिज सईद याला पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी ३२ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला तीन लाख ४० हजार रुपये इतका दंडही ठोठावला आहे. हाफिज हा जमाद उद दवाचा प्रमुख आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरविल्याच्या आणखी दोन प्रकरणांत त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. दहशवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती एजाज अहमद भुत्तर यांनी ही शिक्षा सुनावली.

याप्रकरणी पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने दोन गुन्हे नोंदवले होते. त्यातील एका प्रकरणात त्याला साडेपंधरा वर्षांची तर दुसऱ्या प्रकरणात साडेसोळा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली, असे पीटीआयने म्हटले आहे. हाफिजचे वय आता ७० वर्षे असून त्याला याआधीच्या पाच खटल्यांत ३६ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा कालावधी आता ६८ वर्षे झाला असून या शिक्षा त्याला एकाच वेळी भोगायच्या आहेत. त्यामुळे तो दीर्घ काळ तुरुंगात असणार नाही, असे एका वकिलाने सांगितले.

सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर अमेरिकेने एक लाख डॉलरचे इनामही जाहीर केलेले आहे. त्याची संघटना ही लष्कर ए तैयबाची वरकरणी संघटना असल्याचे मानले जाते. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी मुंबईवरील २६-११ चा हल्ला घडविला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.