आयपीएलच्या 14 व्या पर्वात हैदराबादचा खराब फॉर्म सुरु आहे. त्यांचं कोणतंही प्लॅनिंग संघाला मिळवून देण्यात अपयशी ठरतंय. संघाला पहिल्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. म्हणजेच हैदराबादने केवळ एक लढत जिंकली आहे. हैदराबाद गुणतालिकेत सध्या तळाशी आहे. अशातच हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवून केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय क्रिकेट फॅन्सना आवडलेला नाहीय. त्यांनी सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केलाय.
वॉर्नरच्या चाहत्यांचा सोशल मीडियावर संताप
डेव्हिड वॉर्नरसारख्या मोठ्या खेळाडूसोबत झालेला हा अपमानजनक प्रकार आहे, असं वॉर्नरच्या चाहत्यांना वाटतंय. ज्या डेव्हिड वॉर्नरने 2016 साली हैदराबादला आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं, त्याच वॉर्नरला हैदराबादने अशी अपमानजनक वागणूक दिली, याचा राग वॉर्नरप्रेमींच्या मनात आहे. केवळ चार-पाच सामन्यांत वॉर्नर अपयशी ठरला म्हणून हैदराबादने अशी वागणूक द्यायला नको होती, अशी भावना वॉर्नरप्रेमी व्यक्त करतायत.
डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदापासून मुक्त करण्यात आले आहे, तर केन विल्यमसनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, याबाबत सनरायझर्स हैदराबाद टीम मॅनेजमेंटने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी संघाच्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केले आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, आयपीएलमधील पुढील सामन्यांमध्ये केन विल्यमसन हैदराबादच्या संघाचं नेतृत्व करेल.
संघव्यवस्थापनाने कर्णधार आणि प्लेईँग इलेव्हनमधील खेळाडू बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता संघात डेव्हिड वॉर्नरची भूमिका काय असणार हा प्रश्न आहे, सनरायझर्सच्या संघव्यवस्थापनाने सांगितले की, वॉर्नर संघासोबतच राहील. तो आमच्या संघाच्या यशाचा प्रमुख सूत्रधार आहे. मैदानात किंवा मैदानाबाहेर वॉर्नर संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याने संघासाठी आतापर्यंत जे योगदान दिलं आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो. तथापि, डेव्हिड वॉर्नर प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल की नाही, हे संघ व्यवस्थापनाने आपल्या निवेदनातून कुठेही स्पष्ट केलेले नाही.