महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय भुकंपाच्या हालचाली, नितीश कुमार भाजपची साथ सोडणार!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप यांच्यातले वाद गेल्या काही दिवसांपासून उफाळून आले आहेत, यानंतर आता बिहारमध्ये 11 ऑगस्टआधी एनडीए सरकार जाऊन नितीश कुमार आरजेडीसोबत सरकार बनवणार का? अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींवर नजर टाकली तर भाजप आणि नितीश कुमार यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसत आहे. महिनाभरात 4 वेळा नितीश कुमार यांनी भाजपपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नितीश कुमार दोन आठवडे आधी कोरोना पॉझिटिव्ह आले होते, यानंतर 3 ऑगस्टला त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.

नितीश कुमार भाजपपासून लांब

-सगळ्यात आधी 17 जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली तिरंग्याबाबत देशाच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली, पण या बैठकीला नितीश कुमार गेले नाहीत.

– यानंतर 22 जुलैला तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाच्या भोजनासाठीही नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं, पण या कार्यक्रमालाही ते गेले नाहीत.

– 25 जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण सोहळ्यालाही नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं, यालाही नितीश कुमार यांनी दांडी मारली.

– 7 ऑगस्ट म्हणजेच आज नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या नीती आयोगाच्या बैठकीला बोलावण्यात आलं, पण ते या बैठकीलाही आले नाहीत.

आरसीपी प्रकरणामुळे वाद

माजी केंद्रीय मंत्री आणि आरसीपी सिंग यांनी जेडीयूच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आरसीपी सिंग यांच्यामुळेच भाजप आणि जेडीयू यांच्यातला वाद वाढला. आरसीपी सिंग आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. आरसीपी जेडीयूमध्ये भाजपचा माणूस म्हणून काम करतात, असंही बिहारमध्ये बोललं जातं. मागच्या वर्षी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा नितीश कुमार यांच्या मर्जीशिवाय आरसीपी सिंग यांना मंत्री करण्यात आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी आरसीपी सिंग यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलं नाही, त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, यानंतर नितीश आणि आरसीपी यांच्यातलं अंतर वाढत गेलं. भाजप आरसीपी यांचा जेडीयूला कमजोर करण्यासाठी वापर करत असल्याचं नितीश कुमार यांना वाटत आहे. यानंतर त्यांनी आरसीपी सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यामुळे आरसीपी यांनी जेडीयूमधून राजीनामा दिला.

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंग यांनी आरसीपी सिंग यांच्यावर निशाणा साधला. काही जण बिहारमध्ये पुन्हा एकदा 2020 च्या चिराग पासवान मॉडेलचा वापर करण्याच्या तयारीत होते, पण नितीश कुमार यांनी हे षडयंत्र ओळखलं. आरसीपी तनाने जेडीयूसोबत होते, पण त्यांचं मन दुसरीकडे होतं, असं म्हणत ललन सिंग यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

नितीश कुमारसाठी आरजेडी सॉफ्ट

मागच्या काही दिवसांपासून आरजेडीदेखील नितीश कुमार यांच्याप्रती नरमाईची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. आरजेडीने सर्व प्रवक्त्यांना नितीश कुमार यांच्याविरुद्ध टीका करण्यावर बंदी घातली आहे. नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि दोघं 11 ऑगस्टपर्यंत बिहारमध्ये सरकार बनवण्याचा प्रयत्न करू शकतात, असं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे भाजपलाही नितीश कुमार यांच्या या प्लानची कुणकुण लागली आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली तेव्हा आपण नितीश कुमार यांच्यासोबत 2024 लोकसभा आणि 2025 बिहार विधानसभेच्या निवडणुका लढवू, असं जाहीर केलं.

बिहारमध्ये या राजकीय घडामोडी घडत असतानाच नितीश कुमार यांनी मंगळवारी पक्षाचे खासदार आणि आमदारांची पटण्यामध्ये बैठक बोलावली असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. ललनसिंग यांनी मात्र अशी कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगितलं आहे. तसंच भाजप आणि जेडीयूमध्ये सगळं नीट असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

खरमासआधी सरकार बदलणार?

बिहारमध्ये हा सगळा राजकीय घटनाक्रम सुरू असताना विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना कोरोनाची लागण झाली आहे. 11 ऑगस्टआधी सरकार पडू शकतं, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत, कारण 12 ऑगस्टपासून खरमास सुरू होत आहे. खरमासमध्ये शक्यतो शुभ कार्य केलं जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.