सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचं सांगितलंय. तसेच यामुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचं उत्पादन करण्याबाबत सूचक इशारा दिलाय. ते आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पुनावाला जगातील सर्वात मोठे कोरोना लस उत्पादक आहेत.
अदर पुनावाला म्हणाले, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे.”
दरम्यान, अदर पुनावाला यांना सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच त्यांना वाय सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा केलीय. त्यामुळे त्यांना संपूर्ण भारतात सीआरपीएफच्या (CRPF) जवानांकडून सुरक्षा पुरवली जाईल. पुण्यातील सीरमचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पुनावाला यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं की, “आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोविड 19 विरोधातील युद्ध लढत आहोत. मात्र, मागील काही काळापासून अदर पुनावाला यांना कोविशिल्डचा पुरवठा व्हावा यासाठी वेगवेगळ्या गटांकडून धमक्या येत आहेत.”