सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने अजित पवार नाराज?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २४ वा वर्धापन दिन पार पडला. वर्धापन दिनाचं औचित्य साधत एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संबंधित बैठकीला अजित पवार उपस्थित नसल्याने ही चर्चा सुरू झाली.या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच ही घोषणा केली. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महत्त्वाचं आणि संविधानिक पद आहे. अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडे पक्षाचं एखादं पद दिलं तर तो अन्याय ठरला असता, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला. तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.
डोंगरीतून ५० कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, एक कोटी १० लाख रुपये रोख आणि १८६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) डोंगरी परिसरात केलेल्या कारवाईत २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत ५० कोटी रुपये असून, या छाप्यात एक कोटी १० लाख रुपयांची रोख रक्कम व १८६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.दाऊद टोळीच्या उलाढालींचे प्रमुख केंद्र असलेल्या डोंगरी परिसरात मेफेड्रोनचे वितरण करणारी टोळी कार्यरत असून ती मुंबई व परिसरात त्याचे वितरण करीत असल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात पाळत ठेवली. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे एन. खान ही व्यक्ती अंमलीपदार्थांच्या वितरणात सक्रिय असून लवकरच मेफेड्रोनचा मोठा साठा येणार असल्याचे अधिकाऱ्यांना समजले.
पंतप्रधानपदानंतर आता बोरिस जॉन्सन यांचा खासदारकीचा राजीनामा
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाही. पंतप्रधानपदानंतर आता जॉन्सन यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. ‘पार्टीगेट’ प्रकरणामुळे जॉन्सन यांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या जागेवर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.करोनाकाळात ब्रिटनमध्ये टाळेबंदी आणि संचारबंदी सुरु होती. तेव्हा निर्बंधांच्या काळातही डाउनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. ‘पार्टीगेट’ नावाने हे प्रकरण जगभर गाजलं. तसेच, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोपही जॉन्सन यांच्यावर करण्यात आला होता.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, तीन ठार
मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पुन्हा वांशिक हिंसाचार झाला. हल्लेखोरांच्या हल्ल्यामध्ये तिघे ठार झाले तर दोन जण जखमी झाले. हे हल्लेखोर सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या वेशात आले होते. त्यांनी झडती घेण्याच्या बहाण्याने लोकांना घराबाहेर बोलावले आणि त्यांच्यावर गोळीबार केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.इम्फाळ पश्चिम जिल्हा आणि कांगपोकी यांच्या सीमेवरील खोकेन गावामध्ये ही घटना घडली. हल्लेखोरे मैतेई समुदायाचे असावेत असा संशय असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या गावामध्ये गस्त घालत असलेल्या सुरक्षा सैनिकांनी बंदुकांचे आवाज ऐकल्यानंतर तिकडे धाव घेतली. पण हल्लेखोर पळून गेले. आसाम रायफल्सच्या जवानांनी मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मणिपूर पोलीस, आसाम रायफल्स आणि सैन्याने संयुक्तपणे परिसरात शोध मोहीम राबवली.
ऋषी सुनक यांच्यावर पाच भारतीय भाषेत येणार पुस्तक
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तकाच्या एका महिन्यांमध्ये तब्बल पाच आवृत्या निघाल्या आहेत. आता हे पुस्तक हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराथी सह जर्मन भाषेतही काढण्यात येणार आहे.लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. ” युवक आणि युवतीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लंडनमध्ये राहत असलेल्या आणि तिकडे शिक्षण पूर्ण करून आलेल्या तरूणांच्याकडून या पुस्तकाचे विशेष कौतुक होत आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे”, असं दिगंबर दराडे यांनी सांगितले.
सोलापुरात औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचा प्रकार; तरूणाला अटक
कोल्हापूर, नगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये जातीय दंगली घडविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून शांतता बिघडविण्याचे प्रयत्न होत आहेत. औरंगजेबाची छबीचे समाज माध्यमावर स्टेटस ठेवून आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.दोन दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीत तरूणाला लव्ह जिहादच्या संशयावरून एका टोळक्याने पळवून नेऊन हल्ला केला होता. त्यानंतर औरंगजेबाच्या छबीचे समाज माध्यमावर स्टेटस ठेवण्याचा प्रकार अक्कलकोट रस्त्यावरील गोदूताई परूळेकर विडी घरकुलात घडला आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंपायरने शुबमन गिलची विकेट ढापली! ट्रॉफी जिंकण्यासाठी कांगारूंचा रडीचा डाव
टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात २९६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८ बाद २७० धावांवर आपला डाव घोषित केला. तसेच भारतीय संघाला ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिलला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने वाद निर्माण झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे.भारताला पहिला झटका ४१ धावांवर बसला. स्कॉट बोलँडने शुबमन गिलला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. मात्र, ग्रीनच्या झेलावरून वाद सुरू आहे. खरं तर, स्लिपमध्ये झेल घेत असताना, चेंडू ग्रीनच्या हातात अडकला आणि तो जमिनीवर घासला, पण तिसऱ्या अंपायरने त्याला आऊट दिले. समालोचन करताना दीप दासगुप्ता आणि हरभजन सिंगही शुबमन नाबाद असल्याचे म्हटले. त्यानंतर चाहतेही खूप संतापलेले दिसत होते.
SD Social Media
9850 60 3590