आज दि.१४ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मुंबईमध्ये ED ची मोठी कारवाई, 91.5 किलो सोनं, 340 किलो चांदी जप्त

इडीने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या परिसरात इडीला मोठं घबाड सापडलं आहे, यामध्ये 91.5 किलो सोनं आणि 340 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात चौकशी सुरू आहे, त्याच्या तपासादरम्यान इडीला मागच्या आठवड्यात हे घबाड सापडलं आहे.

इडीला शोध कारवाईदरम्यान मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या लॉकरची झडती घेतली असता योग्य नियम न पाळता लॉकर चालवले जात असल्याचं इडीला आढळून आलं. कोणतेही केवायसी न पाळता तसंच लॉकरच्या आवारात सीसीटीव्ही नसल्याचं, कोणतंही रजिस्टर नसल्याचं इडीला आढळून आलं आहे.जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी एवढी आहे.

अनिल देशमुखांचे ‘घरवापसी’चे दोर कापले, राज्य सरकारने CBI ला दिली संमती

100 कोटी वसुली प्रकरणामुळे कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख विरोधात खटला चालवण्यास CBI ला राज्य सरकारनं संमती दिली आहे. आता याचा अंतिम निर्णय हा राज्यपाल घेणार आहे.राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीला संमती दिली आहे. एखादा शासकीय अधिकारी किंवा माजी मंत्री भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी असेल तर खटला चालवण्यास राज्य सरकारची अनुमती लागते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या विरोधात CBI ने याआधीच दोषारोपपत्र दाखल केलंय.

कर्नाटक सरकारचा पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय, ‘ट्रान्सजेंडर्स’ साठी आरक्षण जाहीर

कर्नाटक सरकारने  पोलीस भरतीबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीत  ‘ट्रान्सजेंडर्स’ साठी आरक्षण जाहीर केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यात 3,484 पदांची भरती करण्यात येणार असून त्यापैकी 79 जागा ट्रान्सजेंडरसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्यात प्रथमच पोलीस भरतीत ट्रान्सजेंडरसाठी म्हणजे तृतीयपंथीयांसाठी पदं राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, या निर्णयाचं विविधस्तरांतून स्वागत होत आहे.

बाप्पा पावला! औरंगाबादच्या गिरीश पटेल यांना लागली 2 कोटी 50 लाख रुपयांची लॉटरी

देव जेव्हा देतो तेव्हा तो भरभरून देतो. याचीचं प्रचिती औरंगाबाद शहरातील व्यावसायिक गिरीश पटेल यांना आली आहे. गणेशोत्सव सणानिमित्त 2 कोटी 50 लाख रुपयांची लॉटरी व्यावसायिक गिरीश पटेल यांना लागली आहे. व्यावसायिक गिरीश पटेल यांना दुसऱ्यांदा ही लॉटरी लागली आहे. यापूर्वी त्यांना 3 कोटी 56 लाख रुपयांची देखील लॉटरी लागली होती.

गिरीश पटेल हे औरंगाबाद शहरामध्ये राहतात. त्यांचे सिव्हिल इंजिनीअरिंगरचे शिक्षण झालेले असून ते कॉन्ट्रॅक्टरशिप व प्रॉपर्टी डिलरचा व्यवसाय करतात. सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण झालेले गिरीश हे पत्नी, दोन मुले, आई, भाऊ-बहिणीसोबत एकत्रित कुटुंबात राहतात. 9 वर्षांपासून ते लॉटरीची तिकिटे घेतात. यंदा गणेशोत्सव सणानिमित्त पंजाब राज्याच्या मंथली डीअर लॉटरीचे पहिले  2 कोटी 50 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जिंकले आहे. नुकतेच 10 सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने या लॉटरीचा निकाल काढण्यात आला होता.

फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रात येणार नाही हे 2020 ला स्पष्ट झाले होते, उदय सामंत यांचा खुलासा

वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरात गेल्याच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनीबद्दल महाविकास आघाडीने 6 महिन्यात फक्त बैठका घेतल्या. ही कंपनी येणार नाही हे जानेवारी 2020 मध्ये स्पष्ट झाले होते, असा मोठा खुलासा शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन कंपनी गुजरातला हलवण्याचा गंभीर आरोप केल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.

अधिकाऱ्यांशी राडा भोवला, बच्चू कडू यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि अधिकाऱ्यांचा वाद सर्वश्रुत आहे. मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्याप्रकरणी गिरगांव कोर्टाने बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी बच्चू कडूंना ताब्यात घेतले असून वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले आहे.

सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. या प्रकरणी आज बच्चू कडू गिरगांव कोर्टात हजर झाले. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मरीन लाईन पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं असून वैद्यकीय चाचणीसाठी रवाना झाले आहे. जेजे रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन जाणार आहे.

गुजरातमध्ये निर्माणाधीण इमारतीची सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली, भयानक घटनेत 8 मजुरांचा जागीच मृत्यू

गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज बुधवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. याठिकाणी एका बांधकामाधीन इमारतीची लिफ्ट तुटली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सध्या सर्वत्र हाहाकार माजला आहे. मृत्युमुखी पडलेले आठ जण हे सर्व मजूर आहेत. ते गुजरातमधील पंचमहाल येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना अहमदाबाद शहरातील पाजरापोळ चौकाजवळ बांधण्यात येत असलेल्या एका बांधकामाधीन इमारतीत घडली. या इमारतीमधील लिफ्ट तुटली आणि लिफ्ट इमारतीत काम करणाऱ्या 8 कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहा वाजता घडली. ही इमारत अस्पायर ग्रुपद्वारे बांधली जात आहे. या इमारतीचे नाव अस्पायर-2 आहे. सर्व मजूर गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील रहिवासी होते. याठिकाणी बांधकाम सुरू होते, यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

बसने जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात मृत्यूनं गाठलं. मिनी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमधील सावजियान भागात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर मंडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये आज म्हणजेच बुधवारी सकाळी अपघात झाला. पुंछच्या सावजियान भागात आज पहाटे एक मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मंडईचे तहसीलदार शहजाद लतीफ यांनी दिली. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत नायब राज्यपालांनी मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणाही केली.

महाराष्ट्रानंतर गोव्यात BJP चं ‘ऑपरेशन लोटस’, काँग्रेसला मोठं खिंडार?

महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष घडवून आणला. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार आलं. आता महाराष्ट्रानंतर पुढचं टार्गेट गोवा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. गोव्यातही ऑपरेशन लोटसच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीला 5 महिने झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यामागे कारणही तसंच होतं.’भारत जोडो यात्रे’मध्ये व्यस्त असलेल्या काँग्रेसला गोव्यात मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी खळबळजनक दावा केला. काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहेत.

Acidity साठी Rantac घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 26 औषधांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

अॕसिडिटी झाली किंवा बऱ्याचदा असं होतं की छोट्या आजारांसाठी दवाखान्यात जाण्याऐवजी आपल्याला माहिती असलेली औषधं जवळच्या मेडिकल स्टोअरमधून घेतली जातात. मात्र तुम्हाला जर ही सवय असेल तर ती महागात पडू शकते. कारण अशा 26 औषधांवर सरकारने बंदी लावली आहे. 26 औषधांमध्ये काही अॕसिडिटीशी निगडीतही औषधं आहेत. ज्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अॕसिडिटीच्या औषधांमध्ये रॅन्टॅक, झिटॅक्ट किंवा अॕसिलॉक ही औषधं जर तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही घेत असाल तर आजच बंद करा. त्यामुळे कर्करोगाचा धोका असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही औषधं घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:च्या मनाने मेडिकलमध्ये जाऊन औषध घेणं महागात पडू शकतं.

एखाद्या राज्याचं वार्षिक बजेट नसेल इतके पैसे इलॉन मस्कने एका दिवसात गमावले!

मंगळवारी अमेरिकेतील महागाईची आकडेवारी समोर आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजार कोसळला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये महागाई 0.1 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. बाजारातील या भूकंपाचा परिणाम अमेरिकन श्रीमंतांच्या भांडवलावरही झाला आहे. अॕमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना एका दिवसात सुमारे 80 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 70 हजार कोटींनी घट झाली आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, जेफ बेझोस हे जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॕमेझॉनचे संस्थापक आहेत. याशिवाय ते स्पेस एक्सप्लोरेशन कंपनी ब्लू ओरिजिनचेही मालक आहेत. इलॉन मस्क हे इलेक्ट्रिक वाहने आणि घरातील सौर बॅटरी बनवणाऱ्या टेस्ला कंपनीचे सीईओ आहेत. मस्क हे स्‍पेसएक्‍सचे देखील मालक आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.