महिनाभरापूर्वी ज्या औरंगाबादमध्ये कोरोनाने हैदोस घातला होता, मोठ्या संख्येने रुग्णसंख्या मिळत असल्याने खाटाही अपुऱ्या पडत होत्या, रुग्णांच्या नातेवाईकांना बेडसाठी धावाधाव करावी लागत होती. परंतु आता कोरोनाचा आकडा दिवेसंदिवस कमी होऊ लागला आहे. कोरोनाची साखळी तुटायला हळूहळू सुरुवात झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील 70 टक्के खाटा रिकाम्या आहेत. शिवाय ऑक्सिजनची मागणीही घटली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हावासियांनी महिन्याभरात चित्र पालटून दाखवलं, असं म्हणता येईल.
महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांत कोरोनाने धुमाकूळ घातला. यामध्ये मुंबई, पुणे, सातारा, औरंगाबाद या आणि अशा काही शहरांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यात महिनाभरापूर्वी दररोज हजारो रुग्ण मिळत होते. पण नागरिकांनी केलेलं सहकार्य, शासनाने उचलेली कठोर पावलं, प्रशासनाचं योग्य नियोजन आणि व्यवस्था या सामूहिक प्रयत्नांनी औरंगाबादमधील रुग्णसंख्येचा आलेख चांगलाच घटलाय. परिणामी ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत होती, आता मात्र जिल्ह्यातील 70 टक्के खाटा रिकाम्या आहेत.
सरकारने घालून दिलेले निर्बंधांना नागरिकांनी देखील चांगली साथ दिली. त्याचमुळे औरंगाबादच्या रुग्णसंख्येचा आलेख झटपट खाली आला. औरंबादमध्ये बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 26 एप्रिल रोजी 12 हजार 795 अँक्टिव्ह रुग्ण होते, म्हणजेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता आजघडीला सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 60 टक्क्यांनी घटली आहे. तसंच नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी मोठी आहे.
शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे तसंच नागरिकांच्या शिस्तीमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. पण कोरोनाचं संकट अजूनही दूर झालेलं नाहीय. त्यामुळे नागरिकांनी आता तसे नियम पाळत होते, तसेच नियम इथून पुढच्या काळामध्येही पाळणं गरजेचं आहे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.