राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात अस्तित्वात असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचं एकत्रित असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे राज्याच्या सत्तांतराचा फैसला 20 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर शिंदे गटाच्या विरोधात गेला तर महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसांमधील राजकीय घडामोडी आणखी वेगळ्या मार्गाला जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सुरु असलेल्या काही उलटसुलट चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. यासाठी त्यांनी 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला आहे. ‘अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू’, अशा आशयाची त्यांची फेसबुक पोस्ट आहे.
“1995 साली जेव्हा पहिल्यांदा युती सरकार विजयी झाले. म्हणजे पहिले बिगर काँग्रेस सरकार आले. तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आणि ते मुख्यमंत्री असतानाच काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. ते वर्षा बंगल्यावर राहत होते. त्यावेळेस मोबाईल नव्हते. आणि बॅलेट पेपरवरती मोजणी चालू होती. त्यामुळे निकाल यायला उशीर लागत होते. निकाल जसजसे येत गेले तसे वर्षा बंगल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना जाणीव झाली कि काँग्रेस बहुमत प्राप्त करू शकत नाही. ठरवलं असतं तर बहुमत प्राप्तही करू शकली असती”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“पण, मला आठवतंय कि दुसऱ्याच दिवशी मी स्वतः वर्षा बंगल्यावर उपस्थित होतो. निकाल लागण्यापासून ते मनोहर जोशी यांचा शपथविधी होईपर्यंत. साहेबांकडे गेलेले ज्येष्ठ नेते.. त्यांची नावे मी इथे लिहू इच्छित नाही. त्या सगळ्यांनी साहेबांना आग्रह करत होते कि साहेब सरकार बनवूया. आपण सरकार बनवू शकता. तेव्हा साहेबांच वाक्य होतं.. ‘जनमत आपल्या विरोधात आहे. असं सरकार बनवणं योग्य नाही. त्यामुळे आपण विरोधी बाकावर बसायला हवं.’ हे वाक्य त्यांचे म्हणजेच पवार साहेबांचे आहे. दिल्लीचा किंवा काँग्रेस हायकमांडचा काहीही संबंध नव्हता”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“मी ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष ही विरोधी बाकावर बसण्यात गेली आहेत. साहेब पहिल्यांदा 1967 ला निवडून आले तेव्हापासून आजपर्यंत ते विधी मंडळाचे नाहीतर संसदेचे सदस्य आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्यांसाठी मी हे लिहीत आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सूचित केलं.