ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक असल्याची जोरदार चर्चा आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या आंदोलना आधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ नये या मुद्दयावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा झाली असून ही चर्चा सकारात्मक झाली आहे, असा दावाही त्यांनी केला.
ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी येत्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात चिंतन बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही इम्पिरिकल डेटाबाबत केंद्राकडे आम्ही मागणी केली आहे. केंद्राकडून हा डेटा मिळावा ही अपेक्षा आहे. तसेच डेटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, असा सवाल वडेट्टीवार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.