फुटबॉल जगताचा बादशाह ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते जगभरात आहेत. कतार येथे झालेली फिफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा रोनाल्डो जिंकू शकला नाही. या विश्वचषकानंतर रोनाल्डो आता युरोपियन क्लब सोडून सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणार आहे. यासाठी त्याला फुटबॉल विश्वातील सर्वाधिक मानधन म्हणजेच 1800 कोटी रुपये देण्यात येणार आहे. अशातच रोनाल्डोने तो खेळत असलेल्या क्लबचे नाव घेताना चांगलाच घोळ घातला.
रोनाल्डो आणि अल नासर क्लबमध्ये अडीच वर्षांसाठी करार झाला आहे. क्लबमधील रोनाल्डोची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रोनाल्ड़ोला प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देताना रोनाल्डोकडून मोठी चूक झाली. पत्रकार परिषदेत रोनाल्डोने सौदी अरेबियाचा उल्लेख दक्षिण अफ्रिका असा केला, त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
पत्रकार परिषदेत बोलताना रोनाल्डो म्हणाला, “माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात येणं म्हणजे माझ्या करिअरचा शेवट नाही. लोक काय म्हणतात याची मला खरोखर काळजी वाटत नाही, असं रोनाल्डो म्हणाला. मी माझा निर्णय घेतलाय आणि तो बदल स्वीकारण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, परंतु माझ्यासाठी मी येथे आल्याचा आनंद खरोखर खूप मोठा असल्याचं रोनाल्डोने म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.