जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आणि फुटीरतावादी घटनांसाठी UAPA चा आरोपी असलेल्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख मोहम्मद यासिन मलिक याने एनआयए कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. मलिकवर यूएपीए, देशद्रोह आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
“मी या कलमांखाली केलेले आरोप फेटाळत नाही”, असं यासीनने म्हटलं. याचा अर्थ यासीन मलिकला खटला लढवायचा नाही आणि अशा परिस्थितीत न्यायालय थेट त्याच्या शिक्षेची तपासणी करेल. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह 19 मे ला यासिनला सुनावलेल्या शिक्षेवर युक्तिवाद ऐकणार आहेत. यासीनवरील आरोपांनुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
याआधी न्यायालयाने 16 मार्चला यासीन, लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईद, हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन, फुटीरतावादी नेता शाबीर शाह, मसरत आलम आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानी धन्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याकडून मिळालेल्या निधीतून ते काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचं काम करत होते, असे न्यायालयाचे मत होते.