स्वतःची एक कार असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. काही स्वतःच्या वापरासाठी आणि कुटुंबाच्या सोईसाठी कार घेतात. तर काही लोक व्यवसाय करण्यासाठी कार खरेदी करतात. कारचा आकार, फीचर्स यानुसार या कार्सची किंमत असते. छोट्या कार्सची किंमत कमी असते तर मोठ्या कारची किंमत जास्त असते. त्यामुळे आपली आवडती कार घेण्यासाठी बजेट कमी असलं की अनेक जण बँक किंवा वित्तीय संस्थांच्या मदतीने कार लोन घेतात.
कार घेण्यासाठी तुम्ही आठ वर्षांच्या कालावधीसाठी बँकेकडून सात टक्के दराने कर्जदेखील घेऊ शकता; पण तुमच्या लोनचा व्याजदर हा तुमचा क्रेडिट स्कोअर, वय, व्यवसाय या गोष्टींवर अवलंबून असेल. कारच्या ऑन-रोड किमतीच्या 90-100 टक्के तुम्ही बँकेकडून फायनान्स मिळवू शकता. काही अशा बँका आहेत ज्या तुम्हाला 8 टक्क्यांपेक्षा कमी दरात कार लोन देतात. या संदर्भात फायनॅन्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिलंय.
स्वस्त कार लोन देणाऱ्या बँका
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक SBI किमान 7.30 टक्के दराने कार लोन देते. तिथे तुम्हाला लोनच्या रकमेच्या 0.25 टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून भरावी लागेल. ही रक्कम किमान एक हजार रुपये ते कमाल 5 हजार रुपये असू शकते
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदामधून तुम्ही किमान 7 टक्के दराने नवीन कारसाठी लोन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 1500 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेकडून 7.30 टक्के दराने कार लोन घेऊ शकता. इथे तुम्हाला कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून भरावी लागेल. ही फी किमान 1 हजार रुपये आणि कमाल 5 हजार रुपये असेल.
अॅक्सिस बँक
तुम्ही अॅक्सिस बँक या खासगी बँकेकडून स्वस्त दरात कार लोन घेऊ शकता. तुम्ही Axis Bank मध्ये किमान 7.45 टक्के दराने कार लोन घेऊ शकता. यामध्ये 3500-7000 रुपये प्रोसेसिंग फी म्हणून भरावे लागतील.
कार लोन कोणाला मिळू शकतं?
प्रत्येक बँकेचे कार लोन देण्याचे पात्रता निकष वेगळे असू शकतात; पण बहुतांश बँकांमध्ये समान असलेले पात्रता निकष खालीलप्रमाणे :
– लोनसाठी अर्ज करणाऱ्याचं वय 18-75 वर्षांदरम्यान असावं.
– मासिक उत्पन्न किमान 20 हजार रुपये असावं.
– सध्या जिथे काम करताय तिथे किमान 1 वर्ष काम केलेलं असावं.
– लोनसाठी अर्ज करणारा कोणत्याही सरकारी किंवा खासगी कंपनीत पगारदार किंवा सेल्फ एम्पॉईड असावा.
तुम्ही कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वर दिलेल्या निकषांची पूर्तता करावी लागेल. तसंच बँकांचे आणखी वेगळे निकष असतील, तर ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील.