महाविकासआघाडीने शनिवारी काढलेल्या मोर्चावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचा उल्लेख नॅनो मोर्चा असा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ महाविकासआघाडीच्या मोर्चाचा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला, पण हा व्हिडिओ 2017 सालच्या मराठा मोर्चाचा असल्याचं समोर आलं.
या व्हिडिओवरून संभाजीराजे छत्रपती यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा !”, असं ट्वीट छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे.
दरम्यान मराठा मोर्चा संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांच्याविरुद्ध उद्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा मोर्चाने दिली आहे.
राऊतांचं दुसरं ट्वीट
संजय राऊत यांच्या या ट्वीटवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. “मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!” असे संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी मराठा मोर्चाच्या गर्दीचा व्हिडिओ ट्विट केला, त्याची ‘चौकशी करणार’ असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावरुन पुन्हा संजय राऊत यांनी ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिले.”जरूर चौकशी करा… मराठा मोर्चा ही सुध्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे..महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती…करा चौकशी! आपल्या चोर कंपनीला clean cheat देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत!”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.