सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रणजीत सिन्हा बिहार कॅडरचे १९७४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१२ ते २०१४ दरम्यान ते सीबीआयच्या संचालकपदी होते.
सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती होण्याआधी रणजीत सिन्हा यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) नेतृत्व केलं होतं. याशिवाय दिल्ली आणि पाटणामध्ये सीबीआयच्या वरिष्ठ पदावरही होते. सीबीआयचे प्रमुख असताना रणजीत सिन्हा अनेक वादांमध्ये अडकले होते. इशरत जहाँ चकमक प्रकरणावरुन त्यांचा गुप्तचर विभागाशी वाद देखील झाला होता.२०१४ मध्ये त्यांच्या पत्नीने पाटणामधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. कोळसा खाण घोटाळ्याच्या तपासात मध्यस्थी करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. २जी घोटाळ्यातील आरोपी किंवा कंपन्यांचे प्रतिनिधी अनेकदा त्यांच्या निवासस्थानी गेल्याचं समोर आलं होतं.