राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी नेते, आमदार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य आली. सातत्याने महापुरुषांचा अवमान झाल्याने सरकारविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण झालं. राज्यात गेल्या काही काळात सरकार विरोधात तयार झालेला हा नकारात्मक सूर दूर करण्यासाठी भाजपने आता मेगा प्लान हाती घेतला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दणक्यात साजरी करण्याचे आदेश भाजपने दिले आहेत. यानिमित्ताने भाजपकडून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला जाणार आहे.
प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपचा मेगाप्लान
यंदा शिवजयंती दिवशी भाजपकडून राज्यभरात व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम व रक्तदाब शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी महारक्तदान शिबीराची सुरुवात शिवजयंतीच्या मुहूर्तावर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच राज्यात महारक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालय व विद्यापीठ यांना आदेश दिले आहे. 19 फेब्रुवारीला 500 हून अधिक ठिकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजनाची योजना आहे. यामध्ये 159 नर्सिंग महाविद्यालये, 90 आयुर्वेदिक महाविद्यालय, 70 होमिओपॅथी महाविद्यालयांचा समावेश आहे.