नांदेडमध्ये अंगावर माकड बसल्याच्या दहशतीने एका चिमुकल्याचा बळी गेलाय. मुदखेड तालुक्यातील बारड गावातील ही घटना आहे. माकड अंगावर येऊन बसल्याची चिमुरड्याने एवढी धास्ती घेतली की त्याला त्याच भीतीने हृदयविकाराने झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
बारड गावातील दहा वर्षीय वीर नागेश संगेवार हा घरासमोर खेळत होता. त्याचवेळी एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले. त्यानंतर या मुलाने भयंकर धास्ती घेतली. त्यातच त्याला ताप आल्याने त्याला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान त्याच्या विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या. मात्र त्या सर्व नॉर्मल आल्या. मात्र माकडांबद्दलची त्याच्या मनातील दहशत कमी झाली न्हवती. त्यातच 13 ऑगस्ट रोजी त्याचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.
बारड शिवारात माकडांनी हैदोस घातला असून याबाबत वन विभागाकडे तक्रारी करूनही माकडाचा बंदोबस्त झालेला नाही. त्यामुळे वीरच्या या मृत्यूला बारडच्या गावकऱ्यांनी वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप केलाय. त्यातच पूर्वी बंदूक धारी पहारेकरी गावात माकडांना हुसकावण्यासाठी कार्यरत होता. आता तो ही नसल्याने मर्कट लीला वाढल्या आहेत.
बारड परिसरात पूर्वी मोठया प्रमाणात वनक्षेत्र होते. इथले आयुर्वेदिक वनक्षेत्र तर एक वरदान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोड वाढलीय. शिवाय लाकूड तस्करी करणारे देखील वाढल्याने वनसंपदा नष्ठ होतेय. त्यामुळे माकडासारखे प्राणी गाव-शिवारात वावरताना दिसतायत. त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केल्याचे परिणाम माणसाला आज न उद्या भोगावेच लागणार आहेत. मात्र आजच्या या दुर्दैवी घटनेमुळे बारड गावावर शोककळा पसरलीय.
(फोटो क्रेडिट गुगल)