नागपूर शहरात जीवघेणी थंडी, पाच जण मृतावस्थेत आढळले

नागपूर शहरात यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद काल झाली. मंगळवारी पारा 7.6 अंशांपर्यंत घसरला. हाडे गोठविणारी थंडी ठरतेय जीवघेणी ठरत आहे. शहरातील विविध भागात पाच जण मृतावस्थेत आढळले आहेत. ते थंडीचे बळी तर नाहीत ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

गणेशपेठ, कपिलनगर व सोनेगाव परिसरात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वामन अण्णाजी सावळे (रा. गणेशपेठ वस्ती) हे 65 वर्षीय वृद्ध फूटपाथवर मृतावस्थेत आढळले. तर कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 53 वर्षीय ट्रकचालक अशोक सोनटक्के (रा. गंजीपेठ) हे कामठी रोडवर ट्रकमध्ये मृतावस्थेत सापडले. याशिवाय सोनेगाव परिसरात 54 वर्षीय उदय भुते हेसुद्धा मृतावस्थेत दिसले. सोनेगाव येथे 50 वर्षीय अनोळखी महिलेचा तर सदर येथीही 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले. तिघांचाही मृत्यू थंडीने झाला असावा, असा अंदाज वर्तविला आहे.

रविवारी सायंकाळपासूनच गारठा वाढला होता. सोमवारी किमान 7.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. हवेचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिण दिशेला आला की, वातावरण कोरडे होईल आणि तापमानात घसरण नोंदविली जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मंगळवारी नागपुरात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, विदर्भातील सर्वात कमी तापमान गडचिरोली जिल्ह्याचे होते. गडचिरोलीत 7.4 अंश सेल्सिअससह विदर्भातील सर्वाधिक गारठा होता.

थंडीच्या लाटेचा प्रभाव मंगळवारीही विदर्भात तीव्रतेने जाणवला. काल राज्यात नीचांकी तापमानाची नोंद झालेल्या नागपूरच्या तापमानात पुन्हा घट होऊन पारा या मोसमातील नीचांकीवर आला. तर पूर्व विदर्भात येणाऱ्या गडचिरोली येथे सर्वात कमी म्हणजेच ७.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली. याशिवाय अमरावती (7.7 अंश सेल्सिअस), वर्धा (8.2 अंश सेल्सिअस) आणि गोंदिया (8.4 अंश सेल्सिअस) सह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात मोठी घट झाली. कमाल तापमानातही दिवसेंदिवस घसरण होत आहे. थंडीची तीव्र लाट आणखी चोवीस तास कायम राहणार आहे. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.