शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकार आणि प्रशासनाकडून झालेलं दुर्लक्ष, आर्यन खान प्रकरणाला देण्यात आलेलं महत्त्व यावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. विनायक मेटे यांनी फक्त बीड जिल्ह्यात 1 जानेवारी पासून आजच्या तारखेपर्यत शासकीय आकडेवारी नुसार 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर 70 ते 75 शेतकरी आत्महत्येची नोंदचं प्रशासनाकडे नोंद झालेली नाही. शेतकऱ्यांची लेकरं म्हणवून घेणाऱ्यांसाठी ही लाज आणणारी बाब आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सरकारी अधिकारी, नेते कोणीही गेले नाहीत. जनाची नाही तर मनाचीही लाज सरकारला वाटत नाही. मुर्दाड मनाचं हे सरकार असून त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे, असं विनायक मेटे म्हणाले. सरकारला शेतकऱ्यांच काही देणं घेणं नाही, पण नबाब मालिकांचा जावई कसा सुटेल, शाहरूखच पोरगं कस सुटेल? यातच सरकारला स्वारस्य आहे. दिवाळीत जर शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर दिवाळीनंतर शिवसंग्रामचा पहिला मोर्चा बीड जिल्ह्यात सरकार विरोधात निघेल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.
शरद पवारांना मराठा आरक्षणावर बोलायला वेळ नाही
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही. दोन महिने झाले तरी मराठा आरक्षणाबाबत सरकारने साधी बैठकही बोलावली नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. सरकार चालवणाऱ्याला शरद पवारांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही. पवारांना बाकी सगळ्या विषयांवर बोलायला वेळ आहे.
शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागणाऱ्या सरकारला शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायला वेळ नाही. शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार, किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचं यावर अद्याप निर्णय नाही, सर्व कार्यकर्त्यांवर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असंही मेटे म्हणाले. आर्यन खान व समीर वानखडे प्रकरणात सगळे प्रश्न बाजूला ठेऊन जे सुरु आहे ते खूप खालच्या पातळीवरच लक्षण आहे, अशी टीका देखील विनायक मेटे यांनी केली.