विनायक मेटेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक रसायनी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला आहे. रसायनी पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे, यानंतर हा ट्रक आता रसायनी पोलीस स्टेशनमध्येच उभा करण्यात आला आहे. या ट्रक चालकाची चौकशी सुरु आहे.
ट्रक ड्रायव्हरचं नाव उमेश यादव असल्याचं सांगितलं जात आहे. हा ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा इथला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 आहे, तसंच हा ट्रक आयशरचा असल्याचंही समजतंय. हा ट्रक पालघरचा असून ट्रकच्या मालकाने ड्रायव्हरची ओळख पटवली आहे. ट्रक मालकाने ओळख पटवल्यानंतर पालघर पोलीस काल मालकाला घेऊन गुजरातच्या वापीला रवाना झाले होते. वापीमधून या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं.
मेटेंच्या पत्नीचा मृत्यूवर संशय
काल पहाटे पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात झाला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आज बीडमध्ये मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान विनायक मेटे यांच्या पत्नीने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. डॉक्टर असलेल्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी मेडिकल टर्मिनोलॉजी सांगितली. विनायक मेटे यांचा चेहरा जास्त पांढरा पडला होता, मृत्यूनंतर लगेच चेहरा पांढरा पडत नाही, यासाठी थोडा काळ जातो, असं ज्योती मेटे म्हणाल्या.