संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची कमान भारतानं सांभाळली आहे. सागरी सुरक्षा, आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेवर होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. भारत सलग तीन उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. यात सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय शांती या गंभीर विषयांवर चर्चा होईल. 9 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्हर्चुअल बैठकीत भाग घेतील. पहिल्यांदाच एका भारतीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एखाद्या गंभीर मुद्द्यावर चर्चा होत आहे. भारतासाठी हे मोठे राजनैतिक यश आहे. आशियात भारताच्या वाढत्या यशाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारताचा दहशतवादविरोधी अजेंडा जगजाहीर आहे.
अशा परिस्थितीत जागतिक दहशतवादाविरोधात पंतप्रधान मोदींच्या या महत्त्वाच्या बैठकीत आवाज उठवला जाईल. यासह, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेबाबतही देशांचे मत घेतले जाईल, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची रणनीती तयार करता येईल.
रविवारी माहिती देताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, भारत तीन उच्चस्तरीय बैठका घेईल. ज्यात शांतता राखणे, दहशतवादाविरोधात कारवाई आणि सागरी सुरक्षेसारखे गंभीर मुद्दे उपस्थित केले जातील.
संयुक्त राष्ट्राचे भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील, ज्यांनी UNSC बैठकीचे अध्यक्षत्व करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा हा आठवा कार्यकाळ आहे.
भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 देशांचा समावेश आहे, त्यापैकी 10 अस्थायी सदस्य आहेत. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत. भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे.