भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा श्रीगणेशा ४ ऑगस्टपासून होत आहे. भारतीय क्रिकेट व कर्णधार विराट कोहली यांच्यासाठीही मालिका अत्यंत महत्त्वाची असून, भारतीय संघ विजय मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. तत्पूर्वी, विराट कोहली याने प्रसारण वाहिनीचा प्रतिनिधी म्हणून भारताचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक याच्याशी बोलताना या मालिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
येथे कठोर परिश्रम करावे लागतील
विराटने दिनेश कार्तिकशी बोलताना आगामी मालिकेविषयी महत्त्वपूर्ण मते व्यक्त केली. तो म्हणाला, “पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपल्याला दररोज अथक प्रयत्नांसह उत्कृष्टता प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
येथे तुम्हाला स्वतःला सांगावे लागेल की, कठोर परिश्रम करायचे आहेत आणि प्रत्येक कसोटी सामन्यात दररोज कठीण असलेल्या परिस्थितींना सामोरे जायचे आहे.”
येथे विजय मिळवणे मोठी उपलब्धी
इंग्लंडविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण मालिकेत भारतीय संघाला जिंकण्याची किती संधी आहे असे विचारले असता विराट म्हणाला, “तुम्हाला या प्रकारच्या मालिकेसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल. माझ्यासाठी येथे कसोटी सामना किंवा कसोटी मालिका जिंकण्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. आम्ही मैदानावर पाऊल ठेवतो आणि स्पर्धा करतो. आम्हाला प्रत्येक कसोटी सामना जिंकायचा आहे, तेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.”
विराटने यापूर्वी दोन वेळा इंग्लंड दौरा केला असून, २०१४ दौऱ्यात तो पूर्णतः अपयशी ठरला होता. मात्र, २०१८ दौऱ्यावेळी त्याने मागील अपयश धुवून काढतात जबरदस्त कामगिरी केली होती.
भारतीय संघाला विजयाची प्रतीक्षा
भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजयाची प्रतीक्षा २००७ पासून आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये १-० अशी सरशी साधली होती. त्यानंतर, एमएस धोनीच्या नेतृत्वात २०११ व २०१४ अशा दोन दौर्यात, तर विराटच्या नेतृत्वात २०१८ च्या दौऱ्यात भारतीय संघाला सपशेल पराभव पाहावा लागला होता.