महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस होत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातही हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्याना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपिट आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.