देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ९३ हजार ५२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात २ लाख ७३९ कोरोना रुग्ण आढळले असून ९३ हजार ५२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसंच १०३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसंच देशात सध्याच्या घडीला १४ लाख ७१ हजार ८७७ अँक्टिव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार १२३ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
देशात कोरोनाचे एक लाख ८४ हजार ३७२ रुग्ण बुधवारी आढळले होते. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक होता. मात्र गुरुवारी रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आणि नव्या उच्चांकाची नोंद झाली. बुधवारी कोरोनाने १,०२७ जणांचा बळी घेतला. गेल्या सहा महिन्यांतील कोरोनाबळींचा हा उच्चांक होता.
सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात
देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली जात आहे. इतर राज्यांतही रुग्णवाढ झपाट्याने होत असून, गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशात २०,५१२ नवे रुग्ण आढळले. याच कालावधीत तिथे ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रा पाठोपाठ छत्तीसगडमध्ये १५६ कोरोनाबळींची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये दैनंदिन रुग्णवाढीने १५ हजारांचा टप्पा ओलांडला. मध्यप्रदेशात दिवसभरात ८,९९८ रुग्ण आढळले तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.