टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा आजचा पहिला दिवस आहे. या पहिल्याच दिवशी केएल राहुलने ( K L Rahul) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकदातरी लॉर्ड्सवर शतक ठोकावं, असं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचं असतं. पण प्रत्येकांच स्वप्न पूर्ण होतच असं नाही. पण केएल राहुलने ते करुन दाखवलंय. केएलने लॉर्ड्सवर शतक ठोकत पराक्रम रचलाय. केएलने 212 चेंडूत 9 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलंय. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 6 वं शतक ठरलंय. तसंच केएल लॉर्ड्सवर शतक लगावणारा 10 वा भारतीय ठरला आहे.
केएल कसोटीमध्ये लॉर्ड्सवर शतक ठोकणारा एकूण 10 वा भारतीय ठरला आहे. आतापर्यंत भारताकडून लॉर्ड्सवर विनू मंकड, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ, अजित आगरकर, राहुल द्रविड, रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणे या 9 फलंदाजांनी हा कारनामा केलाय. तसेच यानंतर आता केएल हा 10 वा फलंदाज ठरला आहे.
भारताकडून 7 वर्षानंतर लॉर्ड्सवर शतक झळकावण्यात आलंय. याआधी 17 जुलै 2014 रोजी अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली होती. अंजिक्यने तेव्हा 154 चेंडूत 15 चौकार आणि 1 सिक्ससह 103 धावांची खेळी केली होती.
भारताकडून लॉर्ड्सवर सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम दिलीप वेंगसरकर यांच्या नावे आहे. वेंगसरकर यांनी लॉर्ड्सवर 3 कसोटी शतकं लगावली आहेत. तसेच लॉर्ड्सवर सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम हा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनच्या नावे आहे. वॉनने एकूण 6 शतकं ठोकली आहेत.
(फोटो क्रेडिट गुगल)