आज दि.२३ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

टीका पुरेशा आधारांवर
असायला हवी : न्यायालय

राजधानी दिल्लीमध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून सुरुवातीपासूनच वाद सुरू आहेत
नव्याने उभारण्यात येणारं संसद भवन आणि त्यासोबत पंतप्रधान, उपराष्ट्रपतींची निवासस्थाने, महत्त्वाची सरकारी कार्यालये या सर्वांचा समावेश असलेल्या या प्रकल्पाची उभारणी सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, त्यावर आक्षेप घेणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते राजीव सुरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, “प्रत्येक गोष्टीवर टीका होऊ शकते, पण ती टीका देखील पुरेशा आधारांवर असायला हवी”, असं म्हणत न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे.

राज्यात आणखी दोन
दिवस पावसाची शक्यता

राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा
प्रश्न लवकरच सुटेल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वाय. बी. सेंटरमध्ये संजय राऊत व शरद पवार यांच्यात बैठक झाली. संजय राऊत अचानक पवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले होते. बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असे म्हटले आहे.

चचाजान, अब्बाजानच्या अनुयायांना
निक्षून सांगतो, लोकांच्या भावना भडकवू नका

योगी आदित्यनाथ यांनी असदुद्दीन ओवैसी यांना समाजवादी पक्षाचे एजंट म्हणत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. “मी आज या चचाजान आणि अब्बाजानच्या अनुयायांना निक्षून सांगतो, की त्यांनी लक्षपूर्वक हे ऐकून घ्यावं. जर उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या भावना भडकवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलात, तर अशा वेळी सक्तीने गोष्टी कशा हाताळायच्या, ते उत्तर प्रदेशमधील सरकारला चांगलंच ठाऊक आहे”, असं आदित्यनाथ म्हणाले. सीएएच्या मुद्द्यावरून असदुद्दीन औवैसी लोकांच्या भावना भडकवत असून ते सपाचे एजंट असल्याचं आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

पारंपरिक इंजिन वाहनांची
नोंदणी थांबणार नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “सरकार इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यायी इंधनांनाही प्रोत्साहन देत आहे, परंतु पारंपरिक इंजिन असलेल्या वाहनांची नोंदणी थांबणार नाही.”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग संस्थेच्या कार्यक्रमाला वर्चुअली संबोधित करताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.

रामायण एक्स्प्रेसमधील
वेटर्सचा गणवेश बदलला

रेल्वेने रामायण एक्स्प्रेसमधील वेटर्सचा गणवेश बदलला आहे. वेटर्सच्या भगव्या पेहरावावर उज्जैनच्या साधूंनी आक्षेप घेतल्यानंतर रेल्वेने हा बदल केला आहे. वेटर्सचा भगवा पोशाख हा हिंदू धर्माचा अपमान आहे, तो बदलला नाही तर १२ डिसेंबर रोजी दिल्लीत ट्रेन रोखू, अशी धमकी साधूंनी दिली होती. त्यानंतर रेल्वेने हा बदल केला आहे.

तर ओबीसींचं आरक्षण
वाचलं असतं : पंकजा मुंडे

ओबीसी आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्याच्या निर्णयावरून पंकजा मुंडेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन काम करत होते. आता मात्र लोक मला विचारतात की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय? राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आलेल्या सरकारने जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर मार्गक्रमण करायला हवं होतं. पण असं कुठेही होताना दिसत नाही. राज्यातील बहुजन, ओबीसींना अंधकारात लोटणारा निर्णय, अर्थात ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याचा निर्णय या सरकारच्या काळात झाला. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर रद्द होईपर्यंतच्या कालावधीत राज्य सरकारने पावलं उचलली असती, तर ओबीसींचं आरक्षण वाचलं असतं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये
भाजपाचा दारुण पराभव

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला आहे. २१ जागांपैकी १७ जागांवर दणदणीत विजय मिळवत जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी वर्चस्व मिळवले आहे. भाजपाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. अत्यंत चुरशीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीमध्ये ८५ टक्के मतदान झालं.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.