आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच चढाओढ रंगली आहे. अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांच्यानंतर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांनी गोंधळ घातला होता. पण, सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी गावकऱ्यांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी पेढे आणि फटाके फोडून एकच जल्लोष केला.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत असताना भर कार्यक्रमामध्येच रस्त्याच्या वादावरून दोन गटात वाद झाला होता.
जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्ता डोर्ले वाडी गावातून जातो, गावठाणात रस्ता रुंदीकरण 10 मीटर व्हावं की 7 मीटर यावरून गावकऱ्यांमध्ये वाद होता. याच मुद्यावरून दोन गट सुप्रिया सुळे यांच्यासमोरच वाद घालू लागले. खुद्द सुप्रिया सुळे यांना दोन्ही गटाची समजूत काढावी लागली.
या रस्त्याबाबत ग्रामस्थांना सुळे यांनी आश्वासन दिले होते.
आता महिनाभराच्या आत, रस्ता डांबरीकरण झाल्याने ग्रामस्थांनी पेढे, फटाके वाजवत जल्लोष केला. गावातील अंतर्गत वादामुळे गेली दीड वर्षापासून या रोडचे काम रखडले होते. यामुळे या रोडलगत असणारे व्यावसायिक, वाहनधारक, शाळकरी मुलांना रोडवरील उडणाऱ्या धुळीचा सामना करावा लागत होता. सततच्या धुळीमुळे अनेक जणांना दम्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी समन्वय साधून या रोडचे डांबरीकरण केल्याने, डोर्लेवाडी ग्रामस्थांनी पेढे आणि फटाके वाजवत जल्लोष साजरा केला आहे.