भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच भाजप आणि मनसे एकत्र येत युती करणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी भाष्य केलं आहे.
दोन्ही पक्षाच्या विचारधारा जुळतात की नाही?, बेरजेचं राजकारण काय होईल, या दोन मुद्द्यावर युती होईल की नाही हे स्पष्ट होईल. 2012 मध्ये भाजप शिवसेना एकत्र लढल्या त्यावेळी देखील लोकांनी मनसेला भरभरून मतदान केलंं. एकंदरीत गणित लक्षात घेतलं तर भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर, दोन्ही पक्षांना फायदाच होईल, असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक पक्षाची भूमिका आणि परसेप्शन असतं. भाजप मुस्लिम विरोधी आहे, असं म्हटलं जातं. मनसे बद्दलही लोकांना असाच समज असतो. शिवसेनेने अनेक अमराठी खासदार संसदेत पाठवली आहेत. प्रत्येक पक्षात जातीनिहाय गणित पाहूनच तिकीट वाटप केलं जातं. त्यामुळे मनसेबाबत ठराविक समज आहे, असं नाही, असंही देशपांडे म्हणाले.
दरम्यान, परप्रांतियांबद्दल मनसेची जी भूमिका आहे ती आम्हाला मान्य नाही. त्यांनी स्विकरालेली हिंदुत्वाची भूमिका आणि आमचं हिंदुत्व हा समान धागा आहे. मात्र, दुसरा जो मुद्दा आहे त्याचं निराकारण होत नाही तोपर्यंत जर तरला अर्थ नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.