सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनापासूून वाचण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यातच आता सीरम इन्स्टिट्यूट कंपनीचे प्रमुख अदर पूनावाला यांनी महत्वाची घोषणा केली आहे. सीरमची लहान मुलांसाठीची कोरोना लस लाॅन्च होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
अदर पुनावाला आणि अमित शहा यांच्यात काल बैठक झाली. यामध्ये लस आणि त्याच्या पुरवठ्याविषयी चर्चा करण्यात आली. याशिवाय त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांचीही भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अदर पुनावाला यांनी येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीरमची लहान मुलांसाठीची कोवोवॅक्स कोरोना लस लॉन्च होणार असल्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना पुनावाला यांनी सांगितलं की, कोवोवॅक्स लसीवर अजून संशोधन चालू आहे. कोवोवॅक्स ही दोन डोसची लस आहे. जेव्हा कोवोवॅक्स लाँच होईल तेव्हाच त्याची किंमतही लोकांना सांगितली जाईल. पुढच्या वर्षी मार्चपर्यंत 12 वर्षाखालील मुलांसाठीची कोरोना लस येऊ शकते असंही पूनावाला यांनी म्हटलं.
दरम्यान, पुनावाला यांनी सरकारनं केलेल्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले आहे. कोवोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस 12 वर्षांवरील मुलांसाठी विकसीत करण्यात येत आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून 2 ते 17 वर्षे वयोगटातल्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरू असल्याचंही अदर पूनावाला यांनी सांगितलं.