इक्वाडोरमधील जेलमध्ये हिंसाचार, 20 कैद्यांचा मृत्यू

इक्वाडोरमधील जेलमध्ये होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे रविवारी तडके जेलमध्ये झालेल्या दंग्यात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडूनही याची दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रपती गुइलेर्मो लासो यांच्या कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, यात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांना कुएनकाच्या फोरेंसिक सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. या घटनेबाबत बोलताना गृहमंत्री पेट्रीसियो कैरीलो यांनी सांगितले, की जेलमध्ये झालेली ही हिंसाचाराची घटना इतकी भयावह होती, की यात पाच कैद्यांचे अवयव कापून टाकण्यात आले आहेत.

इक्वाडोरच्या जेलमध्ये होत असलेल्या वारंवारच्या हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. जेलमध्ये नेहमी अशा हिंसाचाराच्या घटना घडत असतानाही यावर नियंत्रण न मिळवता आल्याचे नुकत्याच झालेल्या हिंसाचारातून स्पष्ट दिसून येत आहे.

दरम्यान, जेलमधील अशा हिंसाचाराला मुख्य कारण जेलमधील कैद्यांचे गट असल्याचे सांगण्यात येत आहे. इक्वाडोरमध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक मोठा हिंसाचार बघायला मिळाला होता. यात, तब्बल 320 कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कैरीलो यांनी सांगितले, की सध्या या हिंसाचारावर नियंत्रण मिळवले असले तरी अद्यापही जेलमध्ये शस्त्रास्त्र असलेले कैदी असल्याने सर्व खोल्या खाली करून कैद्यांकडून शस्त्र जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

एका माहितीनुसार, सर्वाधिक सुरक्षित म्हटल्या जात असलेल्या जेलमध्ये हा दंगा भडकला आहे. गृहमंत्री कैरीलो यांनी सांगितले, की ही हिंसा कैद्याच्या गटांशी संबंधित असून हे सर्व गट जेलमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून आतील काही कैद्यांनी याला विरोध केल्याने हा हिंसाचार भडकल्याचा अंदाज आहे. पहिल्यांदा इक्वाडोरमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्‍यक असून त्यांनतर आतमधील कैद्यांवर वचक निर्माण केला जाउ शकतो.

तसेच अशा प्रकारे हिंसाचार घडवून आणणार्यांवर योग्य कारवाई करणे आवश्‍यक असून यासाठी तरतुदींची गरज असल्याचेही कैरीलो यांनी सांगितले. दरम्यान, हिंसाचारास कारण ठरलेल्या संशयितांची ओळख पटली असून आता त्यांना जेलमध्ये मिळत असलेल्या सुविधांपासून वंचित राहावे लागणार असल्याचेही कैरीलो यांनी सांगितले. दरम्यान, हिंसाचाराची बातमी सर्वत्र पसरताच कैद्यांच्या नातेवाईकांनी जेलबाहेर एकच गर्दी केल्याचेही चित्र दिसून आले.

इक्वाडोरमध्ये 30 हजार क्षमता असलेली 65 जेल आहेत. परंतु त्यात 30 टक्के अधिक संख्येने कैद्यांचा समावेश आहे. एल तुरी जेलमध्ये गर्दी नाही. अडीच हजार कैद्यांना ठेवण्याची क्षमता असलेल्या या जेलमध्ये केवळ 1 हजार 600 कैदी आहेत. दरम्यान, फेब्रुवारी 2021मध्ये चार जेलमध्ये एकाच वेळी झालेल्या दंगलीमध्ये 79 कैदी मारले गेले होते. ग्वायासच्या एका जेलमध्ये झालेल्या हिंसेत तब्बल 119 कैद्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.