पँगाँग लेकवर अवैध पुलाचे बांधकाम केल्यावर आता चीनने आणखी एक कुरापत काढली आहे. चीनने चुशूलच्या सीमेजवळ मोबाईल टॉवर उभारले आहेत. याबाबतचे फोटो स्थानिक नगरसेवकाने पोस्ट केलेत.
चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) बाजूला मोबाईल टॉवर उभारले आहेत. स्थानिक नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांच्या म्हणण्यानुसार, बीजिंग आपल्या सीमेच्या बाजूला वेगाने पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. चीनने ज्या भागात तीन मोबाईल टॉवर उभारले आहेत, तो प्रदेश लडाखच्या चुशूल भागात भारतीय हद्दीजवळ आहे.
चुशूल लडाखच्या लेह जिल्ह्यातील दुरबुक तहसीलमध्ये आहे. वास्तविक नियंत्रण रेषा चुशुलच्या पूर्वेस सुमारे 8 किमी अंतरावर आहे. त्यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, भारताने आतापर्यंत LAC जवळ असलेल्या काही गावांमध्ये 4G मोबाइल टॉवर स्थापित केलेले नाहीत.
मोबाईल टॉवर संदर्भातील बांधकामे चीनने 1962 मध्ये अवैधरित्या ताब्यात घेतलेल्या भागात केली आहेत. भारताच्या हद्दीपासून अगदी जवळ हे तीन मोबाईल टॉवर आहेत. लडाख भागात चीनने मोठ्या प्रमाणात पूल, रस्ते बांधकामाला सुरुवात केली आहे.भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये अजूनही 4जी सेवा नाही. चुषूलमधील नगरसेवक कोंचोक स्टैनजिन यांनी हे फोटो पोस्ट केलेत. भारतीय हद्दीत टॉवर केवळ कागदावर आहेत. तर चीनच्या भागात मात्र तब्बल 9 टॉवर आहेत, अशी माहिती त्यांनी पोस्ट केली आहे.