केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झालीय. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यात राणेंना 2 सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाशिकमध्ये राणेंविरोधातील पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना मंगळवारी (24 ऑगस्ट) कोकणात जाऊन अटक केली. रात्री उशिरा राणेंना कार्टाकडून अटी शर्तींसह जामीन मिळाला. मात्र, यानंतर लगेचच नाशिक पोलिसांनी नोटीस बजावत राणेंना दुसरा धक्का दिलाय.
नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना भाजप राडा प्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केलाय. भद्रकाली पोलीस ठाण्यात हा गुन्हे दाखल झालाय. सेना भाजप अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत. मंगळवारी (24 ऑगस्ट) शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी समोरा समोर राडा केला होता.
जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.
राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता..