भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे सगळे नेते मुंबईत परतलेत. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा पुन्हा कधी सुरू करायची, याचा निर्णय होणार आहे. राणे यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी महाड न्यायालयाने त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर रात्री उशिरा जामीन मंजूर केला.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील मोठी घडामोड काल घडली. रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटक केली. केंद्रीय मंत्र्याला प्रथम श्रेणी दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले. पोलिसांनी न्यायालयात राणे यांच्या 7 दिवसांच्या रिमांडची मागणी केली पण न्यायालयाने केंद्रीय मंत्र्याला जामीन मंजूर केला आहे.
नारायण राणे यांचे वकील न्यायालयात म्हणाले, पोलिसांनी राणेंविरोधात लावलेली कलमे चुकीची आहेत. तपासासाठी रिमांड मागण्यासाठी पोलिसांनी दिलेली कारणे न्याय्य नाहीत. राणेंना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी कोणतीही सूचना दिली नाही. राणे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची काही उदाहरणे न्यायालयात सादर केली. राणेंच्या वकिलांनी केंद्रीय मंत्र्याचे आरोग्य बिघडल्याचा हवाला देत न्यायालयातून जामिनासाठी अपील केले होते.
महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्याचे प्रथमच घडले. अटकेची शक्यता लक्षात घेऊन राणे यांच्या टीमने अटकेला स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु या प्रकरणाची तातडीची सुनावणी नाकारण्यात आली. मुंबई पोलिसांच्या या कारवाईला विरोध करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर सरकारी यंत्रणा, पोलीस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. भाजपने राणेंची विधान चुकीचे असल्याचे सांगत सध्याच्या संकटात संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे स्पष्ट केले.
जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई गाठली. न्यायालयात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे याही होत्या. राणेंसह भाजपचे सगळे नेते मुंबईत परतलेत. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा पुन्हा कधी सुरू करायची का, याचा निर्णय होणार आहे.