‘बीबीसी’वर करवाई, करचुकवेगिरीचा आरोप : वाहिनीच्या मुंबई, दिल्ली कार्यालयांमध्ये प्राप्तिकर खात्याची तपासणी

 ‘बीबीसी’ वृत्तवाहिनी आणि संकेतस्थळाच्या दिल्ली तसेच मुंबईमधील कार्यालयांमध्ये प्राप्तिकर विभागाने मंगळवारी ‘पाहणी’ केली. हा छापा नसून ‘सर्वेक्षण’ असल्याचे प्राप्तिकर खात्याने म्हटले असले तरी गुजरात दंगलीवरील वृत्तपटावरून वाद निर्माण झाला असतानाच झालेल्या या कारवाईमुळे राजकारण तापले आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केंद्रावर टीका केली असून भाजपने मात्र प्राप्तिकर खात्याच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

ब्रिटिश प्रसारमाध्यम कंपनी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) दिल्ली व मुंबईतील कार्यालयांमध्ये मंगळवारी सकाळीच प्राप्तिकर विभागाची पथके धडकली. करचोरी, आंतरराष्ट्रीय करासंदर्भातील अनियमितता आणि टीडीएस अशा विविध करविषयक कथित गैरव्यवहार प्रकरणांशी निगडित ‘सर्वेक्षण’ करण्यात आले. कार्यालयात उपस्थित पत्रकार-कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आले व प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास मनाई केल्याचा दावा ‘बीबीसी’च्या कर्मचाऱ्यांनी केला. ‘बीबीसी’च्या कार्यालयांमधील करविषयक कागदपत्रे व इतर माहितींचे सर्वेक्षण करण्यात आले. कथित करविषयक अनियमिततेसंदर्भातील कागदपत्रे तपासली जात असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. ‘बीबीसी’च्या वित्तीय विभागातील संगणकांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. ‘बॅकअप’ घेतल्यानंतर संगणक व इतर साहित्य परत दिले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‘बीबीसी’वरील कारवाईमुळे राजकारण तापले आहे. विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सूडबुद्धीने झालेली ही कारवाई अनपेक्षित नव्हती, या सरकारचा विनाशकाळ नजीक आल्याची टीका काँग्रेस , तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली. ‘बीबीसी’ने ‘इंडिया : द मोदी प्रश्न’ हा गुजरात दंगलीसंदर्भातील वृत्तपट प्रदर्शित केला होता व तत्कालीन मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. या वृत्तपटावर केंद्राने बंदी घातली असून यूटय़ूब आणि ट्विटरला या माहितीपटाची लिंक काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

यंत्रणांना सहकार्य -बीबीसी

लंडन : प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकारे सहकार्य केले जात आहे. लवकरात लवकर संबंधित परिस्थितीचा निपटारा होईल अशी आशा आहे, असे लंडनमधील ‘बीबीसी’ मुख्यालयातून स्पष्ट करण्यात आले. मात्र यावर अधिक कोणतेही भाष्य वाहिनीकडून करण्यात आलेले नाही.

कितीही कटकारस्थान केले तरी, (दंगलीसंदर्भातील) सत्य सूर्यासारखे तळपत राहील. ही मंडळी (बीबीसी) २००२ पासून मोदींवर हल्लाबोल करत आहेत पण, प्रत्येक वेळी मोदी निर्दोष ठरले आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.