हाँगकाँगमध्ये रहस्यमय आजाराची
साथ पसरली, सात जणांचा मृत्यू
हाँगकाँगमध्ये एका रहस्यमय आजाराची साथ पसरली आहे. या साथीमध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या सात जणांच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना गोड्या पाण्यातील मासे आणि सी फूडसंदर्भात इशारा दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हाँगकाँगमधील वेट मार्केट्स म्हणजेच मासळी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात माशांची खरेदी विक्री होते. याच ठिकाणाहून बॅक्टेरियल इन्फेक्शनचा प्रसार झाला आहे. सात जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिलाय.
अमेरिका चीन यांच्यात
युद्ध भडकण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून चीन आणि तैवान यांच्यामधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. चीनकडून सातत्याने तैवान हा चीनचाच भाग असल्याचे दावे केले जात आहेत. तसेच, चर्चेतून मार्ग न निघाल्यास बळाचा वापर करून तैवानवर ताबा मिळवण्याचा निर्धार चीनी प्रशासनाकडून बोलून दाखवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे तैवाननं देखील स्वसंरक्षणासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलेलं असताना आता या वादात जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातली महासत्ता होण्यासाठीची स्पर्धा सर्वश्रुत आहेच. मात्र, आता तैवान प्रकरणावरून हे दोन्ही देश प्रत्यक्ष युद्धमैदानात समोरासमोर उभे ठाकण्याची भिती निर्माण झाली आहे.
३९ महिला अधिकाऱ्यांना कायम
सेवेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश
भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांच्या न्यायालयीन लढाईला मोठं यश आलंय. सर्वोच्च न्यायालयाने ३९ महिला अधिकाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. यानंतर या ३९ महिला अधिकाऱ्यांना भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आलंय. न्यायालयानं ७ दिवसात त्यांना कायम सेवेचा दर्जा देण्यास सांगितलं होतं. त्यांना आता कायम सेवेत समाविष्ट करून तो दर्जा देण्यात आलाय.
डाॅ. प्रियंका कांबळेने मिळवली
मासिक पाळी विषयात पीएचडी
मूर्ती लहान पण किर्ती महान’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. काही व्यक्ती ह्या लहान वयातच असं काही काम करतात, ज्यामुळे त्या कित्येकांचा आधार आणि आदर्श बनतात. डाॅ. प्रियंका कांबळे ही सुध्दा अशाच व्यक्तींपैकी एक आहे. २५ वर्षांची प्रियंका वर्ल्ड ह्युमन राईट्स कमिशनची नॅशनल मेंबर आहे. आदिवासी पाड्यातील महिलांसाठी ती काम करते. तिच्या कामाची दखल घेत तिला मासिक पाळी या विषयातील डाॅक्टरेट पदवी देण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा आता
21 नोव्हेंबरला होणार
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२१ च्या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा आता २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. शिवाय, परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्र २६ ऑक्टोबर २०२१ पासून अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. परीक्षेला बसलेले उमेदवार mahatet.in ला भेट देऊन सूचना पाहू शकतात आणि इतर सर्व महत्वाची माहिती मिळवू शकतात.
साखर कारखान्यांनी एकरकमी
एफआरपी द्यावी : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी द्यावी, डिसेंबर मध्ये तीन हजार तीनशे आणि राहिलेली रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्या विषयी
सर्व आरोप अजित पवार यांनी फेटाळले
अजित पवारांनी मौन सोडलं असून तब्बल ६४ सहकारी साखर कारखाने आणि एका सूत गिरणीची यादीच त्यांनी समोर ठेवली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याविषयी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत या ६५ व्यवहारांविषयी कुणीच काहीच का बोलत नाही, असा सवाल देखील उपस्थित केला आहे. जरंडेश्वर प्रकरणावरून होत असलेले आरोप आणि चर्चांचा आता अतिरेक झाल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. “या गोष्टीला १२-१५ वर्ष झाली असतील. मी म्हटलं कशाला आपण त्याला उत्तर द्यायचं. पण त्याचा आता पार अतिरेक झालाय.
उरळीकांचन येथे गोळीबार
तीन जण जखमी एक गंभीर
पुणे इथल्या उरळीकांचन इथं गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. उरळीकांचन आणि लोणीकाळभोर दरम्यान तळवडे फाट्याजवळील चौकात गोळीबाराची घटना घडली. दोन टोळ्यातील जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. अवैध धंद्यांवरुन दोन टोळ्यांमध्ये वाद होता. या वादातून दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
जळगावात मांजरीची
गोळी घालून हत्या
कोंबडीच्या पिल्लाची शिकार केली म्हणून मांजरीला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात ही घटना घडली असून मांजरीच्या मालकाने या घटनेचा व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये माजंरीच्या कपाळाला गोळी लागली असून ती रक्तबंबाळ अवस्थेत तडफडताना दिसत आहे. तर दुसरीकडे आरोपी मात्र कोणताही पश्चात्ताप व्यक्त न करता कुटुंबासोबत वाद घालताना दिसत आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे
SD social media
9850 60 3590