महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्यभिषेक सोहळा दिवस. छत्रपती शिवाजी महाराज यांचा याच दिवशी राज्यभिषेक झाला होता. याच दिवशी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर शिवरायांच्या राज्यभिषेकाचा दिमाखदार सोहळा पार पडला होता. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी केलेलं कार्य कधीच विसरता येणार नाही असं आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येकवर्षी 6 जून राज्यभिषेक दिनी रायगडावर राज्यभिषेक सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. किल्ले रायगडावर दरवर्षी राज्यभिषेक सोहळाचा कार्यक्रम पार पडतो. यावर्षीदेखील कार्यक्रमाची जंगी तयारी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमावर कोरोनाचं सावट होतं. पण यावर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने मोठ्या जल्लोषात शिवस्वराज्य सोहळा दिवस साजरा करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमानिमित्ताने छत्रपती घराण्याचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ला सर केला. किल्ला सर केल्यानंतर त्यांना दम लागला. यावेळी संभाजीराजे श्वासोच्छवास व्यवस्थित व्हावा म्हणून जमिनीवर खाली बसले. यावेळी शेकडो शिवभक्त तिथे उपस्थित होते.
संभाजीराजे यांचा साधेपणाने याआधी अनेकदा बघायला मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत अगदी सर्वसामान्यपणे वागणं, छत्रपती घराण्याचा वंशज असल्याचा गर्व न बाळगता सर्वांशी आपुलकीनं वागणं, असं अनेकांनी अनुभवलं आहे. संभाजीराजेंच्या याच स्वभावाचं दर्शन रविवारी रायगडावर जमलेल्या हजारो शिवभक्तांना आलं. संभाजीराजे हे किल्ले रायगड संवर्धन समितीचे अध्यक्ष आहेत.
संभाजीराजे हे रविवारी दुपारी किल्ले रायगडाच्या चित्त दरवाजाने पायऱ्या चढत गडावर गेले. त्यांच्यासोबत यावेळी शेकडोंच्या संख्येने शिवभक्त मावळे होते. आज पहाटेपासूनच शिवराज्यभिषेक सोहळ्यास विधिवत सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ढोल, ताशा, तुतारी अशा मराठमोळ्या वातावरणात किल्ले रायगड दुमदूमून गेला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येन शिवभक्त, मावळे किल्ले रायगडाच्या दिशेने येऊ लागले आहेत.