राज्यात १११ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, मृत्यूदर १.८१ टक्के
भारतात पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाने पाय पसरवायला सुरुवात केली आहे. राज्यात आज १११ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आगे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात १११ कोरोना रुग्ण आढळले तर १३१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के आहे. मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे.आज राज्यात १० हजार ४१५ कोविड चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी आरटीपीसीआर चाचणी १६६५ आणि आरएटी चाचणी ८७५ झाल्या आहेत. आजचा पॉझिटिव्हीटी दर १.०६ टक्के आहे.
टीम इंडियाची घोषणा! रोहित शर्मा झाला कर्णधार, विराटचेही पुनरागमन
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच विराट कोहलीही संघाचा भाग असणार आहे.टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या उपांत्य फेरीत खेळल्यानंतर आतापर्यंत संघासाठी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण आता हे दोन्ही खेळाडू टी-20 संघात परतले आहेत. त्याचबरोबर शिवम दुबे, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.रोहित शर्मा (कर्णधार), गिल, जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार
”उरलासुरला पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही”, आव्हाडांच्या विधानावर भुजबळांची खरमरीत टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये छगन भुजबळांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर सडकून टीका केली. शिवाय जितेंद्र आव्हाडांच्या श्रीरामांबद्दलच्या विधानाचाही समाचार घेतला.’राम मांसाहारी होता’ या जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे बराच गदारोळ झाला. त्यावर भुजबळांनी खरमरीत टीका केली आहे. ते म्हणाले, रामाबद्दल विधान करुन काही लोक त्यांचाच पक्ष संपवायला निघाले आहेत. पक्ष संपवायला त्यांना बाहेरच्या लोकांची गरज नाही, हीच मंडळी पक्ष संपवतील. काय बोलता, काय करता.. असेल तुमचा अभ्यास. मात्र सध्याची परिस्थिती काय, वेळ काय.. लोकांच्या भावना काय आहेत, याचातरी विचार करा.
थंडीच्या लाटेमुळे दिल्लीमधील पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी; पुढील पाच दिवस राहणार बंद
दिल्लीमध्ये पाचव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील पाच दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे. वाढती थंडी आणि धुक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी याबाबत माहिती दिली.
निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी भाजपची उद्या इस्लामपुरात बैठक
आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपच्या आमदार, खासदार आणि पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी (८ जानेवारी) इस्लामपूरमधील प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात होत आहे. या बैठकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, सांगली, हातकणंगले लोकसभा व विधानसभा प्रचार प्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त वक्तव्ये भोवली, मालदीवमधील तीन मंत्री निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा करून या दौऱ्यातील काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले होते. यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील काही नेत्यांनी त्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका केली. भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. मालदीव सरकारने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे आणि त्यांच्या मंत्र्याने केलेल्या या वक्तव्याशी सरकारचा संबंध नाही, असं म्हटलं आहे.
‘न्यायाचा ध्वज’ फडकत ठेवा! द्वारकाधीश दर्शनानंतर सरन्यायाधीश चंद्रचूडांचं वकिलांना आवाहन
न्यायाचा ध्वजा येणाऱ्या पिढ्यांसाठी फडकत राहील अशा पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड यांनी केले. गुजरात दौऱ्यादरम्यान ते राजकोट येथे बोलत होते.“प्रत्येक नागरिकाला न्याय हक्काची हमी देणार्या समाजाची कल्पना करताना, जिल्हा न्यायालये प्रत्येक नागरिकासाठी प्रारंभिक आधार म्हणून उदयास येतात. नागरिक प्रथमतः सर्वोच्च न्यायालयात येत नाहीत. ते जिल्हा न्यायालयात येतात. त्यामुळे बारचे सदस्य म्हणून तुमच्या कामात तुम्ही आत्मविश्वास निर्माण कराल. न्यायाचा हा ध्वजा येणाऱ्या पिढ्यांमध्ये फडकत राहील याची आम्ही खात्री देतो, हे जिल्हा न्यायालयातील वकील म्हणून आमच्या कार्यक्षमतेत आहे”, असं चंद्रचूड राजकोटमध्ये म्हणाले.
Rich Dad, Poor Dad : श्रीमंत होण्याचे सल्ले देणाऱ्या लेखकाच्या डोक्यावर १.२ अब्ज डॉलर्सचं कर्ज
कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात, रस्त्याकडेला असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर एक पुस्तक आपल्याला हमखास पाहायला मिळतं, ते म्हणजे ‘रिच डॅड, पुअर डॅड’. श्रीमंत कसं व्हायचं? किंवा अधिक पैसे कसे कमवायचे? कुठे गुंतवणूक करायची? यासंबंधीचे सल्ले देणारं ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक जगभरातल्या बेस्ट सेलिंग (सर्वाधिक विकलं गेलेलं) पुस्तकांपैकी एक आहे. परंतु, जगाला श्रीमंत कसं व्हायचं याबाबत सल्ले देणारं पुस्तक लिहिणारा लेखक मात्र प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर सध्या १.२ अब्ज डॉलर्सचं (९ हजार ९८२ कोटी रुपये)कर्ज आहे. परंतु, त्यांना या कर्जाची चिंता नाही. उलट रॉबर्ट कियोसाकी लोकांना कर्ज घेण्याचा सल्ला देत आहेत.प्रसिद्ध लेखक आणि उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी यांचं एक इन्स्टाग्राम रील व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणत आहे की, माझं कर्ज १ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलंय. परंतु, मी दिवाळखोर झालो तर बँकही दिवाळखोर होईल. त्यामुळे मला फार काही अडचण नाही. त्याचबरोबर मला या कर्जाची चिंतादेखील नाही.
बांगलादेशात आज कडेकोट बंदोबस्तात मतदान
बांगलादेशात रविवारी ७ जानेवारीला सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांचा अवामी लीग पुन्हा विजयी होऊन त्या सलग चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. मतदानासाठी सुरक्षेसह सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून शनिवारपासून बेकायदा सरकारविरोधात ४८ तासांचा देशव्यापी बंद पुकारला आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या रेल्वे जळितकांड प्रकरणात बीएनपीच्या नेत्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. या घटनेत किमान चौघांचा मृत्यू झाला होता.
ऑस्ट्रेलियन ओपनमधून नदालची माघार, पुन्हा दुखापतीमुळे झाला बेजार!
22 ग्रँडस्लॅम जिंकणारा चॅम्पियन राफेल नदाल जवळपास वर्षभरानंतर टेनिस कोर्टवर परतल्यानंतर आठवडाभरात पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. स्नायूंच्या किरकोळ दुखापतीमुळे त्याने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेतली.
ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडल्याची माहिती नदालने सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी तो स्पेनला परतला आहे. तो गेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून पण दुखापतीमुळे तो राऊंड ऑफ 64 मध्येच बाहेर पडला होता.
SD Social Media
9850603590