एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्रं दाखवून सरकारी नोकरी बळकावली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे.
समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी ते एससी असल्याचं सांगितलं होतं. आरक्षण मिळवण्यासाठी वानखेडे यांनी बनावट कागदपत्रे दाखवली होते, असा आरोप भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मीने केला आहे. या दोन्ही संघटनांनी जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रारही केली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी वानखेडे दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादरही केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. मात्र, त्यापूर्वीच वानखेडेंवर आरोपांवर आरोप होत आहेत.
मलिकांकडून वानखेडे यांची जात आणि धर्मांतरावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आल्यानंतर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. मी दलित आहे आणि माझा मुलगाही दलित आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे. तर माझ्या मुलीने समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच त्यांच्याशी लग्न केल्याचा दावा समीर वानखेडे यांच्या पहिल्या सासऱ्याने केला आहे.
समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.