सांस्कृतिक वातावरणात भर टाकणा-या मैफीलीमध्ये महत्वाचा वाटा “पाडवा पहाट”चा आहे.पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरुवात करणारा उत्सवच !
पुणे, नाशिक पाठोपाठ धुळे शहरात आग्रारोडवरील फुलवाला चौकातील श्रीराम मंदिरासमोर साधारणतः 2013 ह्यावर्षी बहारदार पाडवा पहाटची सुरुवात झाली असून गेल्या 8 वर्षापासून सदर कार्यक्रम आविरत सुरु असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक पारिजात चव्हाण आणि त्यांच्या पत्नी डाॕ. गायत्री चव्हाण संचलित अंगणी पारिजात फुलला हा कार्यक्रम सादर करतात. दिवसेंदिवस बहारदार आणि रंगतदार होत आहे. पिंपळपाराने खोवलेल्या बीजाचा वटवृक्ष होत चालल्याचा हा पुरावा आहे.
धुळे शहराला कला, साहित्य आणि संस्कृतीचं वैभव प्राप्त आहे. हा वारसा जपण्या बरोबर शहराला स्वतःचा सांस्कृतिक चेहरा प्राप्त व्हावा यासाठी विविध संस्था सातत्याने विविध कार्यक्रमाचे नियोजन करीत असतात. त्यातील प्रामुख्याने नाव घेता येईल असे नावाजलेले वाद्यवृंद.. आॕर्केस्ट्रा म्हणजे पारिजात चव्हाण आणि डाॕ. गायत्री चव्हाण यांचा अंगणात पारिजात फुलला.
गायक पारिजात आणि गायत्री चव्हाण यांनी नुसती आॕर्केस्ट्रामध्ये गाणीगायीली नाहीत तर झी युवा, मुंबई दूरदर्शन वर झळकलेले व दिनांक 18 व 19 जुलै 2015 रोजी सलग युगल गायनाचा “लिमका बुक आॕफ रेकाॕर्ड स्थापित करणारे सुरेल दाम्पत्य म्हणजे पारिजात आणि गायत्री चव्हाण. या दोघांचा आम्हा धुळेकरांना सार्थ अभिमान आहे.
पाडवा पहाट कार्यक्रमात प्रामुख्याने सुरेश वाडकर, कुमार गंधर्व, लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते, सुधीर फडके, सुमन कल्याणपूरकर आदी नावाजलेल्या गायकांच्या आवाजात भावगीतांसह भक्तीगीतांची सुरेल मैफील रंगलेली असते.
अश्विनातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलीप्रतीपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.त्याच दिवशी “पाडवा पहाटचे” आयोजन केलं जातं.साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.सोने खरेदीस प्राधान्य, सुवासीनींकडून पतीला औक्षण, व्यापा-यांसाठी नूतन वर्षाचा प्रारंभ, अशा अनेक बाजूंनी या दिवसाचं महत्व आधोरेखित केले जाते.
धुळे येथील पाडवा पहाट कार्यक्रामास जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, महापौर, नगरसेवक, अनेक शासकीय , निमशासकीय अधिकारी, सर्व पक्षीय प्रमुखांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती प्राधान्याने असते.
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
- सुरेश थोरात .. धुळे