विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बंद दाराआड चर्चा झाली होती. या चर्तेत अमित शाहांसोबत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. पण भाजपने तो दावा अनेकदा फेटाळला आहे. विशेष म्हणजे या दाव्यावरुन आता शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपची बाजू घेतलीय. भाजपने बिहारमध्ये शब्द पाळला. नितीश कुमार यांच्या जागा कमी जिंकून आल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री केलं. मग महाराष्ट्रात कसा शब्द फिरवणार? आता सांगा कोण खरं बोलतंय? असं विधान करुन शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवणारं विधान केलं आहे.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं ही आपली परंपरा आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांच्यात आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत काय चर्चा झाली ते त्यांनाच माहिती. पण जेव्हा माझी सरकार स्थापन करण्याच्या निमित्ताने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी झाल्या त्यावेळेस मी त्यांना खरं काय ते विचारलं. त्यावर त्यांनी मला सरळ सांगितलं, ज्या नितीश कुमार यांच्याबरोबर आम्ही युती केली होती त्या नितेश कुमारांच्या जागा कमी येवूनही आम्ही त्यांना बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. याचा अर्थ समजून घ्या. आमची कमिटमेंट जेव्हा होते तेव्हा आम्ही कमिटमेंट पूर्ण करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“राज्यात घडामोडी घडल्या तेव्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होते. मला देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी सांगितलं की तुमचे 50 आमदार आहेत तरीही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देत आहोत. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं. आम्ही महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द दिला असता तर तो फिरवला नसता. एक महाराष्ट्र आमच्यासाठी मोठा नाही. या देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. एक राज्य शिवसेनेकडे गेलं असतं तरी राज्यात युतीचं सरकार असतं. सांगा आम्ही का विरोध केला असता. आता सांगा कोण खरं बोलतंय?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.