मध्य प्रदेशच्या शिवनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळ यांच्या सोबतीने वीज कोसळण्याच्या वेगवेगळय़ा घटनांमध्ये २ जण ठार, तर १२ जण जखमी झाले. या घटना सायंकाळी घडल्या.
सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पाऊस आणि वीज कोसळणे यामुळे मनुष्यहानी झाली, तसेच मालमत्तेचे आणि वीजवाहक तारांचे नुकसान झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
वीज कोसळण्याच्या या घटना बरघट, धरनखुर्द, टिकरी, साल्हेकाला, आष्टा व सपापर खेडय़ांमध्ये घडल्या. साल्हेकला येथे काही लोक कापणीनंतर शेतातून परतत असताना वीज कोसळल्याने दीपचंद बोपचे (५८) हा मरण पावला, तर त्याच्यासोबतचे काही लोक जखमी झाले.
त्याचप्रमाणे, गौरव सनोडिया हा १६ वर्षांचा मुलगा त्याच्या शेतात वीज पडल्याने ठार झाला, असे हा अधिकारी म्हणाला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अशाच प्रकारच्या घटनांमध्ये किमान १२ जण जखमी झाले आहेत. वीज कोसळल्याने धरनखुर्दमधील एका घराचे आणि इतर ठिकाणच्या वीजवाहक तारांचे नुकसान झाले आहे.