वर्धा जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात पडला. त्यानंतर पावसाने दडी मारली. आता जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी रिमझीम पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. शेतकऱ्यांनी महागाईने घेतलेल्या बियाण्यांची शेतात पेरणी केली. मात्र, काही भागात कडक ऊन पडल्याने पिकांचे कोंब जळून जात आहेत. पावसाचे चिन्हे दिसत नसल्याने जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार 560 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेल्या बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहेत.
जूनमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा खंड पडला आहे. बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला असून पेरणी केलेली पिके वाया जातील की काय? अशी भिती शेतकऱ्यांच्यात मनात निर्माण झाली आहे. पाऊस लांबणीवर पडला तर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे. दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
1 लाख 10 हजार 560 हेक्टर क्षेत्रावर पेरणी
मान्सूनचा पाऊस पडताच जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार 560 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, तूर, कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांची पेरणी केली. यात 11 हजार 339 हेक्टरवर तृणधान्ये तुर, मुग, उडीद, 16 हजार 689 हेक्टरवर सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, तर सर्वात जास्त 82 हजार 532 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. पेरणी तर झाली खरी मात्र, पेरणीनंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचे चित्र असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी.
सध्या पाऊस पडत नसल्याने नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकऱ्यांनी हात टेकले असून, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना कृषी खात्यामार्फत सर्वेक्षण करुन शासनाने बियाण्यासाठी दहा हजारांचे अनुदान देऊन सहकार्य करावे, अशी मागणी शेतकरी मुन्ना मोर्य यांनी केली आहे.