आज दि.२६ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सहाव्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सने कसली कंबर, वानखेडेवर सुरु केला सराव

कोरोना महामारीनंतर यंदा तब्बल 2 वर्षांनी आयपीएल संघांच्या होम ग्राउंडवर सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ देखील तयारीला लागला असून शनिवार पासून मुंबई संघाने सरावाला सुरुवात केली आहे.मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर परतली असून स्टार खेळाडूंनी मुंबईचा कॅम्प जॉईंट केला आहे.टिम वॉर्नर, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, किरॉन पोलार्ड इत्यादी अनेक खेळाडू वानखेडेवर सराव करताना दिसत आहेत.मुंबई इंडियन्सने खेळाडूंचे सरावा दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

‘..तर महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही’ तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान

मागच्या वेळेस नांदेडला आलो तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचं काम तेलंगणात आहे. इकडे का येता? तुम्ही तेलंगणासारख्या सवलती द्या मी तुमच्या राज्यात पाय ठेवणार नाही, असे थेट आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी फडणवीस यांना दिले. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आज बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री केसीआर बोलत होते. या सभेत माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

‘शहरात भाजप-एमआयएमचा दंगल घडवण्याचा कट..’ अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले. यानंतर छत्रपती संभाजीनगरचं वातावरण चांगलचं तापलं होतं. केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने एमआयएमने रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. तर दुसरीकडे भाजपकडूनही याविरोधात मोर्चे काढण्यात आले. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप आणि एमआयएमवर गंभीर आरोप केले आहेत. “एमआयएम आणि भाजपचे लागेबांधे असून यांचा शहरात दंगल घडवण्याचा कट होता” असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येतील का? चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

उद्धव ठाकरे आणि फडणवीस परत एकत्र येण्याची कुठेही चर्चा नाही. बंद खोलीत नाही आणि ओपन गार्डनमध्ये पण नाही. सुतावरून काही परीक्षण केलं जातंय. असे काही चान्स नाहीत. पण राजकारण कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुणे आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.आता आरोप प्रत्यारोप खूप झाले शद्ब वापरून काहीही होत नाही. लोकांना हे आवडत नाही. त्यामुळे आता हे थांबवलं पाहिजे. मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागणे हे काय लगेच हिंदुत्व सोडलं असं नाही. मुस्लिम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केलं असेल म्हणून मालेगाव मध्ये बोर्ड लागले असतील, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मालेगावच्या सभेवर प्रतिक्रिया दिली.

रामदास आठवलेंची शरद पवार यांना ‘ऑफर’ तर राहुल गांधींना ‘सल्ला’

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली. देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी नागालँडप्रमाणे इतर ठिकाणीही एनडीएसोबत यावं असं आठवले म्हणाले. तसंच यावेळी रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना सल्लासुद्धा दिला आहे.

रामदास आठवले म्हणाले की, “नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध,मोदींच्या कडून पवारांचें अनेक वेळा कौतुक झाले आहे.” राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवरही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय.

हात धुण्यासाठी शेतकरी उतरला नदीच्या पाण्यात अन् मगरीने साधला डाव

राजस्थानमध्येमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डांगरिया गावातील चंबळ नदीत एका व्यक्तीला मगरीने खाल्याची घटना समोर आली आहे. गुरे राखण्यासाठी गेलेल्या तरूण बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू होता. यावेळी त्याचे अवशेष सापडल्याने त्यावरून पुरावा शोधण्यात आला आहे. जनावरांना फिरवण्यासाठी गेलेला तरूण नदी किनारी जाताच मगरीने झडप घातल्याने तो गायब झाला होता. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू होता.

शोधकार्यात सिव्हिल डिफेन्सने स्थानिक पोलिस आणि ग्रामस्थांचेही सहकार्य घेतले आहे. दरम्यान त्याच्यासोबत असलेली जनावरेही गायब असल्याने त्यांचाही शोध सुरू होता. हा शोध सुरू असतानाच तरूणाच्या हाडांचा सापळा पोलिसांच्या हाती लागला आहे.  हा सापळा नागरी संरक्षण दलाने शोधून काढल्याचे बोलले जात आहे.

PM मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली या मुलाची दखल

मागच्या चार दिवसांपूर्वी बिहार राज्य दिवस साजरा करण्यात आला. बिहार दिनानिमित्त, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथील गांधी मैदान येथे चौमुखा गावातील 16 वर्षीय धीरजला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. तसेच त्याच्या अभ्यासासाठी एक लॅपटॉप, एक अँड्रॉइड मोबाईल, बॅग आणि एक स्मार्ट घड्याळ दिले. पण, मुख्यमंत्र्यांनी धीरजला हा सन्मान का दिला, हे तुम्हाला माहीत आहे का?

अडीच वर्षांपूर्वी धीरजने गंडक नदीपरिसरात मगरीच्या तोंडातून आपल्या 11 वर्षाच्या भावाला सुखरूप बाहेर काढले होते. त्याच्या या शौर्याबद्दल, गेल्या वर्षी 24 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला पीएम राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले होते. दरम्यान याच्या शौर्याचा सन्मान म्हणून बिहार सरकारनेही त्याला पुरस्कार दिला आहे.

प्रवाशांकडून 1 कोटी वसूल करून महिलेनं बनवला रेकॉर्ड; रेल्वे तिकीट चेकरचं मंत्रालयानंही केलं कौतुक

जगात लाखो लोक सरकारी नोकरी करतात. पण सरकारप्रती कर्तव्य, निष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. खूप कमी लोक आहेत जे आपल्या कामालाच पहिली प्राथमिकता देतात आणि त्यात कसलाही दोष नसावा यासाठी ते मेहनत घेतात. जे असं करतात ते यशस्वी होतात, आणि त्यांचं कौतुक नक्कीच होतं. जग त्यांचा आदरही करतं. अशाच एका महिला रेल्वे कर्मचाऱ्याचं मंत्रालयातूनच कौतुक होत आहे. जिने विभागाला करोडोंचा नफा कमावून दिला आहे.

रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट @RailMinIndia वर महिला तिकीट तपासनीस श्रीमती रोजलिन अरोकिया मेरी यांचं कौतुक केलं. ज्यांनी प्रवाशांकडून ₹1 कोटी दंड वसूल करून अनोखा विक्रम केला. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांचं खूप कौतुक होत असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी CM शिंदे पोहोचले राज ठाकरेंच्या घरी!

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड पाहण्यास मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावात आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या भाषणाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.

धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला पेटवले; ठाण्यात खळबळ

ठाण्याच्या मुब्रामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्रवाशाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रुमालाला आग लावून हा रुमाल अपंग प्रवाशाच्या अंगावर फेकण्यात आला. या घटनेमध्ये प्रवाशाच्या हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे या जखमी प्रवाशाला उपचारासाठी तब्बल बारा तास बेड देखील मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धावत्या रेल्वेत प्रवाशाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रमोद वाडेकर (वय 35) असं या अपंग प्रवाशाचं नाव आहे. हा प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकलमध्ये अपंग व्यक्तिच्या डब्यातून प्रवास करत होता. लोकल कळवा मुब्रा स्थानकात येताच एका गर्दुल्यानं त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर रुमालाला आग लावून तो रुमाल या प्रवाशाच्या अंगावर फेकला. या घटनेत हा प्रवासी जखमी झाला.

श्रीवल्ली आणि बाजीरावने दिली Good News; संजय गांधी उद्यानात 13 वर्षांनी हलला पाळणा

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तब्बल 13 वर्षांनी चार बछड्यांचा जन्म झाला आहे. शनिवारी दुपारी 12.30 ते 3 च्या सुमारास वेळेत श्रीवल्ली या वाघिणीने बछड्यांना जन्म दिला. बाजीराव वाघ आणि श्रीवल्ली वाघिणीची ही पिल्ले असून ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांच्या देखरेखीखाली आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सन 2010 मध्ये बछड्यांचा जन्म झाला होता. या वाघांपैकी लक्ष्मी सध्या उद्यानात आहे. बंदिस्त वातावरणात राहणाऱ्या प्राण्यांना जन्म देणे ही सोपी गोष्ट नसते, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी सांगितले. श्रीवल्लीला मार्च 2022मध्ये उद्यानात आणले होते. तिला ताडोबा येथे पकडण्यात आले होते. तर बाजीरावला चंद्रपूर जिल्ह्यात राजोरा येथे पकडले होते. त्याला डिसेंबर 2020 मध्ये मुंबईत आणले होते. बंदिस्त परिसरामध्ये प्राण्यांमध्ये लैंगिक संबंध निर्माण झाले, तरी मादी जन्म देईल, याची खात्री नसते. बंदिस्त जागेत असलेल्या इतर प्राण्यांमुळे तिला तिच्या बछड्यांना मारून टाकण्याची भीती वाटते. त्यामुळे अशा वातावरणात गर्भधारणा कठीण असते.

वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात सुपरहिट, महिनाभरातच प्रवासी संख्येचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात राज्यातील 2 वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर मुंबई- साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन गाड्या सुरू झाल्या. या मार्गावरील अन्य रेल्वेंपेक्षा ‘वंदे भारत’ला भाडं जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, गेल्या महिनाभरातील आकडेवारीनुसार ही एक्स्प्रेस राज्यात सुपरहिट ठरली आहे.मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या वंदेभारत एक्स्प्रेसनं 32 दिवसांच्या कालावधीमध्ये 1,00,259 प्रवाशांची वाहतूक केलीय. या गाड्यांनी आत्तापर्यंत 8 कोटी 60 लाखांचा महसूल रेल्वेच्या खात्यात जमा केला आहे.  मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील प्रवासी संख्येतून 2.7 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील प्रवासी संख्येतून  2.23  कोटींचा महसूल प्राप्त केला आहे.

निखत झरीनची सुवर्ण कामगिरी! महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताला तिसरं सुवर्णपदक

नीतू घंघास आणि स्वीटी बुरानंतर भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनने देशाला महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिल आहे. यंदाच्या स्पर्धेतील भारताला मिळालेले हे तिसरे सुवर्णपदक असून 50 किलो वजनी गटात निखतने ही कामगिरी केली आहे.

भारताच्या निखत झरीनने 50 किलो वजनी गटात वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये व्हिएतनामच्या बॉक्सरचा पराभव केला आहे.  तिने व्हिएतनामच्या न्यूगेन थी ताम हिचा 5-0 ने दारुण पराभव केला. फायनलमध्ये  सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी सुरु ठेऊन पहिल्या फेरीत प्रतिस्पर्ध्या विरुद्ध 5-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या फेरीतही तिने आघाडी कायम ठेवली. अखेर तिसऱ्या सामन्यातही यशस्वीपणे प्रतिस्पर्धी खेळाडूला मात देऊन निखतने सामना जिंकला.

अमरावती : अंनिसने ‘हे’ आव्‍हान देताच गुरूदास बाबाचे गावातून पलायन

गेल्‍या काही दिवसांपासून चुलीवरचा बाबा म्‍हणून समाजमाध्‍यमावर चर्चेत आलेल्‍या मार्डी येथील गुरूदास बाबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्‍हान देताच या बाबाने गावातून पळ काढल्‍याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गरम तव्‍यावर बसून भक्‍तांना शिव्‍या हासडत असलेल्‍या या बाबाची एक चित्रफित समाजमाध्‍यमांवर चांगलीच प्रसारित झाली. गरम तव्‍यावर बसलेल्‍या या बाबाचे नाव संत गुरूदास महाराज असे असून मार्डी येथे या बाबाचा एक आश्रम आहे. समाज माध्‍यमांवर प्रसारित झालेली चित्रफित ही महाशिवरात्रीच्‍या कार्यक्रमातील आहे. आपण अंधश्रद्धा पसरवण्‍याचे काम करीत नाही, आपल्‍याला दैवी शक्‍ती प्राप्‍त होते, त्‍यावेळी आपल्‍याला भान राहत नाही. हा श्रद्धेचा भाग आहे. आपण साधू, संत नाही, असे या बाबाने सांगितले.

एकाच वेळी ३६ उपग्रह अंतराळात, भारतातल्या सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

ISRO ही भारताची एक राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे. इस्रोने गेल्या काही वर्षांत अनेक यश संपादन केले आहे. आजसुद्धा इस्रोने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोने आज LVM3-M3 रॉकेटचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केले आहे. याद्वारे एकाच वेळी ३६ उपग्रहांचे अवकाशामध्ये स्थापित करण्यात आले आहे. आज सकाळी ९ वाजता हे यशस्वी प्रक्षेपण पार पडले.अधिकृत माहितीनुसार, ४३ मीटर उंची असणाऱ्या इस्रोच्या रॉकेटने ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केले. LVM3 ने ज्या उपग्रहांसह उड्डाण केले त्यांचे एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मोहिमेला LVM3-M3/OneWeb India-2 असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने ट्विट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली .

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.