आज दि.२५ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

टिम भाऊ आला रे! ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडची मुंबई इंडियन्समध्ये थाटात एंट्री

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्च रोजी आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना पारपडणार असून यंदा 10 संघ आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याची मैदानात उतरणार आहेत. अशातच आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघामध्ये टिम डेव्हिडची मराठमोळ्या अंदाजात एंट्री झाली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर टिम डेव्हिड आयपीएल 2023 साठी मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. मुंबई इंडियन्सने टिम डेव्हिडच्या एंट्रीचा व्हिडिओ शेअर केला असून यात डेव्हिड मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. डेव्हिडचे मुंबई संघात आगमन होताच त्याचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्याला नारंगी रंगाचा फेटा परिधान करण्यात आला असून व्हिडिओला मराठीतील सुपरफिट गाणं “ऐका दाजीबा” च बॅकग्राउंड म्युझिक देण्यात आलं आहे.

राहुल गांधींचं सावरकरांवर वादग्रस्त विधान

मानहानीच्या प्रकरणात खासदारकी रद्द केल्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना लंडनमध्ये दिलेल्या भाषणाबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी चांगलेच संतापलेले दिसले. भाजप नेते तुम्हाला संसदेत माफी मागायला सांगत होते, मग तुम्ही माफी का मागितली नाही, असा सवाल राहुल गांधींना करण्यात आला. तुम्ही याबद्दल काय विचार करता? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी उत्तर दिले की, ‘राहुल गांधींना वाटते की माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत.

सेंद्रिय शेतीसाठी तरुण इंजिनिअरने लढवली भारी शक्कल, घराच्या टेरेसवरच पिकवतो भाजीपाला

स्वतःच्या घराच्या गच्चीवर एक आकर्षक हिरवीगार बाग तयार करणं, हे प्रत्येक कोपऱ्यात कुंडीमध्ये झाडं लावण्याइतकं सोपं नाही; पण तमिळनाडूतल्या विरुधुनगरमधल्या एका इंजिनीअर तरुणाने स्वतःच्या घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग केलाय. हा प्रयोग यशस्वी झाला असून, या तरुणाचा प्रवास प्रेरणादायी आहे. बाजारात मिळणारा रसायनमिश्रित भाजीपाला टाळण्यासाठी घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे भूमिनाथन.

तमिळनाडूमधल्या तिरपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातले रहिवासी असलेले भूमिनाथन यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी ही आवड जपली आहे. भूमिनाथन यांनी सुरुवातीला घराच्या गच्चीवर काही कुंड्यांमध्ये व टाकाऊ भांड्यांमध्ये भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना ‘टेरेस फार्मिंग’ची संकल्पना समजली व त्यांनी घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती हा प्रयोग यशस्वीपणे सुरू केला.

‘राहुल गांधींना घाण्याला जुंपलं पाहिजे’, सावरकरांच्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं

‘सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहूल गांधी यांना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या घाण्याला जुंपलं पाहिजे. मग त्यांना कळेल. आज ही ते म्हणाले की माफी मागायाला मी सावरकर आहे का? त्यांना याची शिक्षा पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या सावरकर विधानावरून टीका केली.

2022 च्या 13 क्रिकेट सामन्यांमध्ये भ्रष्टाचार? धक्कादायक रिपोर्ट आला समोर

क्रिकेटमध्ये मागील बऱ्याच महिन्यांपासून भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली नव्हती. परंतु हाती आलेल्या एका ताज्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या तब्बल 13 कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट सामन्यांमध्ये सट्टेबाजी, मॅच-फिक्सिंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्पोर्टडार इंटेग्रिटी सर्विसेसने हा रिपोर्ट जाहीर केला असून यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेस युनिट ही काही तज्ञांची आंतरराष्ट्रीय टीम क्रिकेटमध्ये होणारी अनियमित सट्टेबाजी, मॅच-फिक्सिंग आणि खेळांमधील भ्रष्टाचाराच्या इतर प्रकारांचे विश्लेषण करते. त्यांनी ‘बेटिंग, करप्शन अँड मॅच-फिक्सिंग’ या 28 पानांच्या अहवालात म्हंटल्यानुसार 2022 मध्ये, 92 देशांमधील 12 क्रीडा शाखांमध्ये 1212 सामने संशयाच्या भोवऱ्यात आहेत.  सामन्यांदरम्यान संशयास्पद गोष्टी शोधण्यासाठी कंपनी युनिव्हर्सल फ्रॉड डिटेक्शन सिस्टम (UFDS) या ऍप्लिकेशनचा वापर करते.

देशातील प्रोजेक्ट टायगरच्या ‘गोल्डन ज्युबिली’ निमित्त ५० रुपयांचे ‘टायगर कॉईन’

देशात ‘प्रोजेक्ट टायगर’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय ‘स्मारक नाणे’ जारी करणार आहे. ५० वर्षे पूर्ण झाल्यावर ५० रुपयांचे स्मरणार्थी नाणे काढले जाईल.या संदर्भात अधिसूचना जारी करताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने सांगितले की, हे नाणे चतुर्थांश धातूचे आणि ४४ मिमीचे गोलाकार असेल. चतुर्थांश मिश्रधातूमध्ये चांदीचा वाटा ५० टक्के, तांबे ४० टक्के, निकेल ५ टक्के आणि जस्त ५ टक्के असेल. दातेरी कडांची संख्या २०० असेल. नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल. त्यावर ‘सत्यमेव जयते’ कोरलेले असेल. त्याच्या डाव्या परिघावर देवनागरी लिपीतील ‘भारत’ हा शब्द असेल आणि उजव्या परिघावर इंग्रजीत ‘इंडिया’ हा शब्द असेल. सिंह स्तंभाखाली रुपयाचे चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये मूल्य ₹५० हे देखील असेल.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर केरळ काँग्रेस वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या कारवाईविरोधात केरळमध्ये ठिकठिकाणी काँग्रेसकडून निषेध आंदोलने करण्यात आली. राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देत असताना केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन यांनी सांगितले की, आम्ही वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज आहोत.शेकडो काँग्रेस कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केरळ राजभवनावर मोर्चा काढला. हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रस्त्यावर तात्पुरते बॅरिकेड्स उभारली. आंदोलकांनी ही बॅरिकेड्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, ज्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले.

अफगाणिस्तानने शारजाहमध्ये रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानवर मिळवला विजय

सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. संयुक्त अरब अमीराती अर्थात यूएईमधील शारजाह स्टेडियममध्ये या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने ६ गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.