उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक; ‘रालोआ’चे उमेदवार जगदीप धनखड यांचे पारडे जड

लगेचच मतमोजणी

देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी शनिवारी मतदान होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. आकडेवारीचा विचार करता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांचा विजय निश्चित दिसत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने अल्वा यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी एकमताचे प्रयत्न झाले नाहीत, असा दावा  करून मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केल्याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.

८० वर्षीय अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून, त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तेलंगणा राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चाने अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीननेही अल्वा यांना पाठिंबा दिला आहे.

धनखड ७१ वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजाचे आहेत. संयुक्त जनता दल, वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, अण्णा द्रमुक आणि शिवसेनेने धनखड यांना पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांच्या समर्थनामुळे धनखड यांना सुमारे ५१५ मते मिळण्याची अपेक्षा आहे. अल्वा यांना आतापर्यंत मिळालेला पक्षांचा पाठिंबा पाहता त्यांना जवळपास २०० मते मिळतील, असा अंदाज आहे. अल्वा यांनी चित्रफीत संदेशात आवाहन केले, की संसदेचे कामकाज प्रभावी व्हायचे असेल, तर खासदारांना परस्पर विश्वास निर्माण करण्यासाठी आणि  संवाद पुन्हा सुरू करण्याचे मार्ग शोधावे लागतील. खासदारच आपल्या संसदेचे चारित्र्य ठरवतात.

एम व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत असून, नवे उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेतील. लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांसह नामनिर्देशित सदस्य या निवडीसाठी मतदान करण्यास पात्र असतात. अल्वा यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांच्या खासदारांसाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते.

धनखड यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी भाजप खासदारांची भेट घेतली. संसद भवनात शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून, संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.