महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढलं आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 4 हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलीय. धक्कादायक म्हणजे मुंबईत सापडलेल्या रुग्णांपैकी तब्बल 99 टक्के रुग्णांमध्ये घातक आणि अत्यंत वेगानं पसरणारा ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आलाय.
मुंबईत सापडलेल्या 202 रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी तब्बल 201 रुग्णांमध्ये ओमायक्रॉन आणि एका रुग्णात डेल्टा व्हेरियंट सापडलाय. यातील 44 टक्के रुग्ण हे 21 ते 40 वयोगटातील आहेत. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांमध्येही ओमायक्रॉनची प्रकरणं आढळून आल्याची माहिती आहे. ठाण्यातही ओमायक्रॉनच्या BA.5 या सबव्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आलेत.
मुंबईचा धोका वाढत असताना सरकारही सावध झालंय. हर घर दस्तक योजना राबवून लसीकरण वाढवण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारनं सर्व राज्यांना ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटबाबत सावधगिरीचा इशारा दिलाय. त्यातही मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट 15.6 टक्क्यांवर गेल्यामुळे प्रचंड चिंतेची स्थिती आहे. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर सरकारनं केलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. नाहीतर घातक ओमायक्रॉनची चौथी लाट धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाही.