राज्यात सध्या कोरोना लसीकरण मोहिम जोरदार पद्धतीने राबवली जात आहे. कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या एक शिक्षिकेचा खड्ड्यामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेकडे ही घटना घडली. ही शिक्षिका आपल्या स्कूटीवरुन जात असताना हा सर्व प्रकार घडला आहे.
कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात हाय प्रोफाईल रितू कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये राहुल कटारिया आपल्या पत्नी दिव्या आणि कुटुंबियांसोबत राहतात. राहुल आणि दिव्या हे दोघेही शिक्षक आहेत. दिव्या या अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत होती.
दिव्या यांना 23 जूनला कोरोनाची लस घ्यायचे होते. त्यामुळे ती तिचा दीर अर्जुन कटारियासोबत लस घेण्यासाठी निघाली. पण लस घेण्यासाठी जात असताना तिच्या स्कूटीमध्ये पेट्रोल कमी आहे, असे तिच्या लक्षात आले. त्यानंतर अर्जुन हा आपल्या वहिनीसोबत पेट्रोल भरण्यासाठी बापगाव येथील पेट्रोल पंपावर जात असताने त्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक केलं.
यानंतर ट्रकच्या पुढे आल्यानंतर काही अंतरावरील रस्त्यावर पाण्याने भरलेला एक खड्डा होता. त्यात खड्ड्यात गाडी अडकल्याने त्यांची स्कूटी स्लिप झाली. या घटनेत दिव्या गंभीर जखमी झाली. यानंतर दिव्या यांना खासगी रुग्णालयात 4 दिवस उपचार सुरु होते. मात्र दिव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांना टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. या घटनेबाबत कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.