ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकारने व्यवस्थित बाजू मांडली असेल तर येत्या 6 जुलै रोजी ओबीसी समाजाला न्याय मिळेल, अशी आशा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 6 जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली नाही, असं त्या म्हणाल्या. बीडमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
केंद्र सरकारने मराठा आरक्षणप्रकरणी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कोर्टाने याचिका फेटाळून लावल्याने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
ईडीकडून होत असलेल्या कारवाईवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आघाडी सरकार प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. राज्याचा केंद्राच्या सक्षमतेवर विश्वास असल्याचं त्यातून दिसून येतं. पण आता ते किती सक्षम आहेत हे त्यांनी दाखवून दिलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.