मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. या दोन्ही दसरा मेळाव्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दिल्लीतही घडामोडी घडत आहेत. दसरा मेळाव्याच्या 24 तासांमध्येच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार अमित शाह यांच्या भेटीला गेले आहेत.
शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. तसंच येत्या काही महिन्यांमध्ये मुंबईसह राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका म्हणूनही पाहिलं जात आहे. याशिवाय अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही घोषणा झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतरच्या या पहिल्याच निवडणुका असतील, त्याआधी अमित शाह, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “आपले देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देशाचे मंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत? हेच कळत नाही. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड, इकडे फोडाफोडी कर, तिकडे फोडाफोडी कर, मध्येच मुंबईत येणार शिवसेनेला जमीन दाखवा. बघाना आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आम्ही त्यांना आज आव्हान देतोय, आम्हाला जमीन बघायचीच आहे. अमित शाहाजी आम्हाला जमीन दाखवा. पण ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन पुन्हा जिंकून दाखवा. ती जमीन आमचीच आहे. आमची मातृभूमी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही जागा तुम्ही परत घेऊ शकलेला नाहीत. चीन अरुणाचल, लडाखमध्ये घुसलं आहे. जा ना ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. हे कशाला पाहिजे हे गद्दार? आम्ही तुम्हाला घेऊन नाचू, मागे नाचत होतो तसे. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय मिरवणुका? हे माझे सैनिक आहेत, हे तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील जर तुम्ही पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवलात तर. तिकडे शेपट्या घालायच्या आणि इकडे येऊन पंजे काढायचे. ही काय मर्दुमकी आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.