कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध घालून वारीसाठी दहा पालख्यांनाच परवानगी दिली आहे. त्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी समर्थन केलं आहे. मंत्रिमंडळात असलेल्यांच्या घरातील आजोबा-पणजोबांपासून सगळे वारी करतात. त्यामुळे वारीचा निर्णय विचार करूनच घेतला आहे, असं सांगतानाच ज्यांना राजकारणच करायचं आहे, त्यांना रोखू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
छगन भुजबळ यांनी वारीबाबतच्या सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या आजोबा-पणजोबांपासून अनेकजण वारी करतात. पण कोरोना वाढू नये म्हणूनच सरकारने काही निर्णय घेतला आहे. लग्नात सुद्धा 50 लोकांना आपण परवानगी दिली आहे. विचार करूनच निर्णय घेतला आहे. तो प्रतिष्ठेचा विषय करू नये. ज्यांना राजकारण करायचं आहे. त्यांना रोखू शकत नाही, असं सांगतानाच वारीबाबत कुणी तरी निर्णय जाहीर करायचा होता. तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे, असं भुजबळ म्हणाले.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट झाली. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार-प्रशांत किशोर भेटले. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्यात काही तरी चर्चा झालीच असेल, असं सूचक विधान करून भुजबळांनी या भेटीचं गूढ अधिकच वाढवलं आहे.
नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणावर काढलेल्या पत्रकाची माहिती नसल्यांच ते म्हणाले. ते पत्रं मी काही वाचलेलं नाही. मराठा समाज समजदार आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजू लागल्या आहेत, असं ते म्हणाले. खासदार संभाजी छत्रपती हे समतोल विचार करणारे आहेत. ते नक्कीच विचार करून निर्णय घेतील, असं एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं.